एनटीपीसीत वृक्ष उत्पादक-खरेदीदार मेळावा; शेतकऱ्यांना नव्या संधींची ओळख
कार्यक्रमात एनटीपीसीचे कार्यकारी संचालक बी. जे. एस. शास्त्री यांनी वृक्ष आधारित शेती ही पर्यावरण संवर्धनासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन केले. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी मुख्य महाव्यवस्थापक एम. के. श्री. बाबू (संचालन व सुरक्षा), अतिरिक्त महाव्यवस्थापक कन्हैया दास, लक्ष्मण आवार (मानव संसाधन) तसेच विभागीय वन अधिकारी शुभांगी जावळे उपस्थित होते.
मेळाव्यात तज्ज्ञांनी प्रगत वृक्षारोपण तंत्रज्ञान, ऊती संवर्धन, कार्बन क्रेडिट, मधमाशी पालन, रेशीम उत्पादन आणि पालापाचोळा आधारित उद्योगातील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय कौशल्याधारित प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यामुळे शेतकरी आणि वृक्ष उत्पादकांना खरेदीदारांशी थेट संवाद साधण्याची, बाजारपेठेतील मागणी समजून घेण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्याची संधी मिळाली. उत्पादनाला योग्य दर मिळवण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
एनटीपीसीकडून भविष्यातही अशा लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment