बार्शीत अभय योजनेला प्रतिसाद; २३.७० कोटींची कर वसुली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

बार्शीत अभय योजनेला प्रतिसाद; २३.७० कोटींची कर वसुली

 बार्शीत अभय योजनेला प्रतिसाद; २३.७० कोटींची कर वसुली




बार्शी (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने घरपट्टी व नळपट्टीवरील दंडव्याज शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार्शी नगरपरिषदेच्या कर विभागात नागरिकांची मोठी गर्दी उसळली. अभय योजनेच्या पार्श्वभूमीवर थकीत कर भरण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने नगरपरिषदेच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.

अभय योजनेच्या अंतिम टप्प्यात ३० व ३१ मार्च या दोन दिवसांतच सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची वसुली झाली. यामध्ये सोमवारी अंदाजे ७० लाख तर मंगळवारी सुमारे ५५ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले. धनादेशाद्वारे मिळालेल्या रकमेचा यात समावेश नसून, ती रक्कम जमा झाल्यानंतर वसुलीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कर अधिकारी विठ्ठल पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण २३ कोटी ७० लाख रुपयांची वसुली झाली असून, ती सुमारे ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. धनादेशांची रक्कम जमा झाल्यानंतर हा आकडा २४ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागाने विशेष प्रयत्न केले. उपमुख्याधिकारी राजाराम नरुटे, वाहन विभाग प्रमुख नागनाथ गायकवाड तसेच कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करत वसुली वाढवली.

शेवटच्या दिवसांत वाढलेल्या गर्दीचे योग्य नियोजन करून नागरिकांना सुरळीत सेवा देण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली होती. अभय योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रलंबित कर वसुलीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला असून, नगर प्रशासनासाठी ही मोहीम अत्यंत यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages