उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दरात घसरण, लिंबू-लसूण महाग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 1, 2026

उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दरात घसरण, लिंबू-लसूण महाग

 उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दरात घसरण, लिंबू-लसूण महाग




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-ऐन उन्हाळ्यात श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्यांच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. गवार, हिरवी मिरची व ढोबळी मिरची वगळता बहुतांश भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर घसरलेलेच असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. मंगळवारी सुमारे १८५ क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून त्याला प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाला. वांग्याच्या दरातही घट झाली असून १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. कोबी व फ्लॉवरची आवक वाढल्याने त्यांच्या दरातही घसरण झाली आहे.

दुसरीकडे लसूण आणि भेंडीचे दर वाढले आहेत. सुका लसूण ७००० ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असून भेंडीच्या दरात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. काकडीच्या दरात मात्र सुमारे ३० टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.

ढोबळी मिरचीची आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ती ७० ते ८० रुपये किलो दराने विकली जात असून बाजार समितीत प्रतिक्विंटल ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मंगळवारी तिची आवक केवळ ६ क्विंटल इतकी होती.

बाजार समितीत ९०० क्विंटल बटाट्याची आवक झाली असून बटाटा ९०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. कांद्याच्या दरातील घसरण कायम असून कांदा ६०० ते १५५० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे.

उन्हाळ्यामुळे लिंबूच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचे दरही वाढले आहेत. लिंबू ६००० ते १२,५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, चुका व पालक या पालेभाज्या ८ ते १० रुपये प्रतिपेंढी दराने उपलब्ध आहेत.

फळबाजारात आंब्याचा दर ‘हाय’

सोलापूरच्या बाजारात हापूस आंबा दाखल झाला असला तरी त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी ५००० ते ७००० रुपये दराने विकली जात आहे.

दरम्यान, कलिंगड, खरबूज, द्राक्ष, चिकू व मोसंबी यांची बाजारात रेलचेल वाढली आहे. मात्र डाळिंब व सफरचंदाचे दर उच्च पातळीवर असून डाळिंब २५० ते ३०० रुपये किलो, तर सफरचंद सुमारे २०० रुपये किलो दराने विकले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages