पोलीस दलाच्या 'पहाट' उपक्रमातून मुळेगाव तांड्याची तहान भागणार! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 11, 2026

पोलीस दलाच्या 'पहाट' उपक्रमातून मुळेगाव तांड्याची तहान भागणार!

 पोलीस दलाच्या 'पहाट' उपक्रमातून मुळेगाव तांड्याची तहान भागणार!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामस्थांच्या मदतीला सोलापूर ग्रामीण पोलीस धावून आले आहेत. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतील 'पहाट' आणि 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत, बेरार फायनान्स लिमिटेडच्या सी.एस.आर. फंडातून या तांड्यावर बोरवेलची निर्मिती करण्यात आली असून, आज त्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
पाणी टंचाईवर पोलिसांचा 'प्रहार'
मुळेगाव तांडा परिसरात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तांड्याला भेट दिली असता, त्यांना ही समस्या प्रकर्षाने जाणवली. त्यांनी तातडीने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना ही समस्या सोडवण्याचे निर्देश दिले.
पोलीस निरीक्षक देशपांडे यांनी नागपूर येथील बेरार फायनान्स लिमिटेड या कंपनीशी संपर्क साधून सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून मदत करण्याची विनंती केली. कंपनीने यास सकारात्मक प्रतिसाद देत बोरवेलसाठी निधी उपलब्ध करून दिला.
व्यसनमुक्तीकडून समृद्धीकडे
'ऑपरेशन परिवर्तन'च्या माध्यमातून या तांड्यावरील अवैध हातभट्टी दारू व्यवसायात गुंतलेल्या नागरिकांना आणि महिलांना या व्यवसायापासून परावृत्त करून सन्मानाने जगण्याची संधी पोलीस प्रशासन देत आहे. बोरवेलच्या निर्मितीमुळे केवळ पाणी प्रश्न सुटणार नाही, तर गावकऱ्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आता तांड्यावर बहरणार 'औषधी वनस्पतींची बाग'
उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एक नवी संकल्पना मांडली. ते म्हणाले की,
"अनेक दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. जर ग्रामस्थ इच्छुक असतील, तर पोलीस प्रशासन गावोगावी अशा वनस्पतींची लागवड करण्यासाठी पुढाकार घेईल."
या आवाहनाला मुळेगाव तांडावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी १ एकर जागा देण्याचे मान्य केले आहे.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी बेरार फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संदीप जावंजळ, अभिजीत महाजन, आशिष राठी, सतीश पोहाडरे, आशुतोष दुबे, तसेच पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सपोनि सोमनाथ कदम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages