लोकमंगल महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन हे लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर, प्रा.वर्षा मानेदेशमुख, प्रा.अपूर्वा पिस्के तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य सागर महाजन यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनप्रवास, स्त्रीशिक्षणातील योगदान, समाजकार्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, समाजातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेला त्याग याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अतिशय खडतर परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातील भेदभाव नष्ट करण्यासाठी केला. त्यांनी स्त्री पुरूष समानता, संविधान निर्माण, समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. प्रा. आशिष सरकाळे यांनी स्वतंत्र भारताचे सृजान नागरिक म्हणून आपण कायद्याचे पालन करणे व महापुरूषांच्या विचारांचे आचरण करणे हीच डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली असेल असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सावरी बिराजदार यांनी व आभारप्रदर्शन अगम जैन यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment