सोलापुरात तापमानाचा पारा चढला, महापालिकेची तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 2, 2026

सोलापुरात तापमानाचा पारा चढला, महापालिकेची तयारी

 सोलापुरात तापमानाचा पारा चढला, महापालिकेची तयारी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. एप्रिल अखेर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.

शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उष्माघात ही गंभीर व जीवघेणी स्थिती ठरू शकते. शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास मेंदू, हृदय आणि इतर अवयवांवर परिणाम होण्याचा धोका वाढतो.

यासाठी महापालिकेने शहरातील १५ आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवले असून, उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे तसेच डोक्यावर संरक्षणासाठी टोपी किंवा ओढणी वापरण्याचे आवाहन केले आहे.

**असे करावेत प्राथमिक उपचार :**

* रुग्णाला त्वरित सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे
* कपडे सैल करून शरीर थंड ठेवावे
* थंड पाण्याने अंग पुसावे किंवा ओल्या कापडाने शेक द्यावा
* शुद्धीवर आल्यास पाणी किंवा ओआरएस द्यावे
* गंभीर स्थितीत त्वरित रुग्णालयात दाखल करावे

*उष्माघाताची लक्षणे :

* शरीराचे तापमान ४० अंशांपेक्षा जास्त होणे
* डोकेदुखी, चक्कर येणे
* अशक्तपणा व थकवा
* घाम येणे बंद होणे, त्वचा कोरडी व तापलेली होणे
* गोंधळ किंवा शुद्ध हरपणे
* जलद नाडी व श्वासोच्छवास

*उष्माघात टाळण्यासाठी उपाय :*

* दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे
* भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे
* सावलीत किंवा थंड ठिकाणी राहावे
* लिंबूपाणी, ताक, फळांचे रस यांचे सेवन करावे

नागरिकांनी उष्णतेची लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages