'झेडपी', पंचायत समितीतील 'स्वीकृत'साठी आठवभरात नियमावली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 9, 2026

'झेडपी', पंचायत समितीतील 'स्वीकृत'साठी आठवभरात नियमावली

 'झेडपी', पंचायत समितीतील 'स्वीकृत'साठी आठवभरात नियमावली

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी ग्रामविकास विभागाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भातील नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या आठ दिवसांत ती प्रसिद्ध होईल.

त्यानंतर तत्काळ शासन निर्णय निर्गमित केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोलापूर येथील नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या घोषणेमुळे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेत १९९२ पर्यंत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जात होती, मात्र त्यानंतर ही पद्धत बंद करण्यात आली होती. आता ३२ वर्षांनंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू होत आहे.

विशेष म्हणजे, पंचायत समित्यांमध्ये पहिल्यांदाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे, यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा परिषद अधिनियमात आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी १० सदस्यांमागे १ स्वीकृत सदस्य तर पंचायत समितीमध्ये प्रत्येक ५ सदस्यांमागे १ स्वीकृत सदस्य अशा नियुक्त्या होतील.

पहिल्या टप्प्यात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, धाराशिव, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या १२ जिल्ह्यांतील निवडणुका पार पडल्या आहेत, या जिल्ह्यात नियुक्त्या केल्या जातील, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीच्या वेळी ज्या तालुक्यांना किंवा नेत्यांना संधी मिळाली नव्हती, त्यांना स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून न्याय दिला जाण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख पक्षांमधील इच्छुकांनी आतापासूनच नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून, नियमावली जाहीर होताच या लॉबिंगला अधिक वेग येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages