उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या ४७ कर्मचाऱ्यांवर महापालिकेची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या ४७ कर्मचाऱ्यांवर महापालिकेची कारवाई

 उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या ४७ कर्मचाऱ्यांवर महापालिकेची कारवाई


सोलापूर, (कटूसत्य  वृत):- महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सुरू असलेल्या नवीन मिळकती शोध मोहिमेत उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या ४७ कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. या कर्मचाऱ्यांना एकूण २८ हजार ५०० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून, ही कारवाई उपायुक्त आशिष लोकरे यांनी केली आहे.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत ८ एप्रिल रोजी आदेश जारी करून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन मिळकतींचा शोध घेणे, अपार्टमेंटमधील शिल्लक फ्लॅट व गाळ्यांची नोंद करून दररोज किमान पाच मिळकतींची आकारणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. एप्रिल महिन्यात एकूण मिळकतींच्या शोध व आकारणीसाठीही विशेष लक्ष्य निश्चित करण्यात आले होते.

मात्र २१ एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी अपेक्षित कामगिरी केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे संबंधित ४७ कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिलपासून एकाही मिळकतीची आकारणी केली नसल्याचे निदर्शनास आले. वारंवार सूचना व आदेश देऊनही कामात सुधारणा न झाल्याने ही बाब गंभीर मानण्यात आली.

या प्रकरणी १० कर निरीक्षक व ३७ वसुली लिपिक अशा एकूण ४७ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कामगिरीत सुधारणा न झाल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२) (ड) नुसार त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. हा दंड ‘एप्रिल पेड इन मे’ वेतनातून वसूल करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages