श्रीकृष्ण गुरुकुलतर्फे शनिवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कामती बुद्रुक येथील श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रमोद आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात पानिपतकार तथा ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील,खा. डॉ. ज्योती वाघमारे, माजी आ. राजन पाटील, प्रगतशील शेतकरी रामराव भोसले-पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक जालिंदर लांडे, कविता अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश भोसले, डॉ. दीपक गायकवाड, सरपंच अंजली भोसले यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने वार्षिक स्नेहसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले असून राधा गुरुकुलच्या आवारात हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमास पालक, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. प्रमोद आवताडे यांनी केले.
२०२१ साली वाघोलीवाडी येथील माळरानावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली. या गुरुकुलने आज गुणवत्तापूर्ण शिक्षण, निवास व भोजनाच्या सोयीसह तालुक्यात उच्च निकालाची परंपरा निर्माण केली आहे. या यशाच्या बळावर संस्थेचा विस्तार होऊन कामती बुद्रुक येथे राधा गुरुकुल (मुलींसाठी निवासी संस्था) तसेच कामती खुर्द (लमाणतांडा) येथे एम.बी. चव्हाण गुरुकुल कार्यरत आहे.
या पत्रकार परिषदेस अर्जुन पाटील, हनुमंत निकम, आप्पासाहेब कोळी, दीपक माळी, राहुल क्षीरसागर, जयसिंग आवताडे, प्रा. ज्ञानेश्वर शिंदे, प्राचार्या कल्याणी कोळी व प्राचार्य किशोर शिनगारे आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment