रयत शिक्षण संस्थेतील शिक्षण म्हणजे संस्कार व गुणवत्तेचा ब्रँड- तुकाराम पाटील
माढा (कटूसत्य वृत्त):- कर्मवीर भाऊराव पाटलांनी ग्रामीण भागातील गोरगरीब,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सहजासहजी शिक्षण मिळावे. या उद्देशाने सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शेकडों शाखा राज्यात कार्यरत आहेत.त्या ठिकाणी कार्यरत उच्चशिक्षित, अनुभवी व तंत्रस्नेही शिक्षक अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कृतियुक्त अध्यापनाचे काम करीत आहेत.ते ज्ञानी, संस्कारक्षम व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम करताहेत.रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कोठेही मागे पडत नाही.या संस्थेच्या विविध शाखांमधील शेकडों विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत मोठे अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत त्यामुळे रयत शिक्षण संस्था म्हणजे संस्कार व गुणवत्तेचा ब्रँडच असल्याचे गौरवोद्गार बार्शी तालुक्यातील उंडेगावचे स्कूल कमिटीचे मार्गदर्शक तुकाराम पाटील यांनी काढले आहेत.
ते उपळाई बुद्रुक ता.माढा येथे रयत शिक्षण संस्थेतून 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत असलेले वरिष्ठ लेखनिक नागनाथ गजेंद्र बरबडे यांचा सपत्नीक सत्कार करताना अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत राऊत यांनी केले.
सेवानिवृत्तीनिमित्त नागनाथ बरबडे व त्यांच्या पत्नी शोभा बरबडे यांचा सत्कार अध्यक्ष तुकाराम पाटील,मुख्याध्यापक हनुमंत राऊत,सहशिक्षिका सुनिता बिडवे,मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या हस्ते करण्यात आला.रयत को-ऑपरेटिव्ह बँक सातारा यांच्या वतीने बरबडे यांना चांदीचे मेडल व शाल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी सरपंच मनोहर गायकवाड यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे व अचूकपणे काम केल्याबद्दल नागनाथ बरबडे यांचा स्कूल कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करणे आमचे कर्तव्य आहे.गुणी व्यक्तींचा सन्मान करणे म्हणजे एक प्रकारचे आत्मिक समाधान होय. सेवाकाळात ज्यांनी चांगले काम केले आहे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे जेणेकरून इतर शिक्षक व कर्मचारी त्यापासून प्रेरणा घेतील असे त्यांनी सांगितले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य विजयकुमार डुरे-पाटील यांनी सांगितले की,नागनाथ बरबडे यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कामापेक्षा संस्थेच्या व शैक्षणिक कामाला प्राधान्य दिले.त्यांच्या अथक प्रयत्नातूनच उंडेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूलची 1 कोटी खर्चातून सुसज्ज व अद्ययावत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. संस्थेचे अत्यंत कडक नियम व शिस्त असताना एकाच शाखेमध्ये सलग 30 वर्षे अविरतपणे काम करण्याची अनोखी किमया नागनाथ बरबडे यांनी केली आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना नागनाथ बरबडे यांनी सांगितले की,रयत शिक्षण संस्थेत मी माझी 32 वर्षे सेवा प्रामाणिकपणे पूर्ण केली याचा मला सार्थ अभिमान आहे. या कालावधीत मला अनेक मुख्याध्यापक,शिक्षक, नातेवाईक व मित्रमंडळी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी लाख मोलाची साथ दिली आहे.
सूत्रसंचालन सहशिक्षक अनिल डोईफोडे यांनी केले.आभार योगेश धस यांनी मानले.
यावेळी माढेश्वरी बँकेचे संचालक ॲड.नानासाहेब शेंडे, मुख्याध्यापक विजयकुमार डुरे, मनोहर गायकवाड,माजी प्राचार्य दिलीप पाटील, चेअरमन नंदकिशोर गायकवाड,प्राचार्य औदुंबर गायकवाड,सेवानिवृत्त पीएसआय हनुमंत उबाळे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, रामलिंग बरबडे,शरद मोहिते, धनाजी बरडे,सुधीर गुंड,श्रीधर बरडे,शोभा बरबडे,माधुरी गुंड,वैष्णवी बरडे,सौरभ बरबडे, अंकुश घोडके, बप्पासाहेब यादव,मुकुंद गायकवाड, बाबासाहेब पठाण माने आर.डी,सुरेखा एनकीकर, महादेवी लंकेश्वर यांच्यासह ग्रामस्थ,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment