सोलापुरात 'वंचित'कडून प्रधानमंत्र्यांच्या पुतळ्याला जोडेमार ; पोलीस -कार्यकर्त्यात झटपट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार केला. या आंदोलनावेळी पोलिस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आर्थिक मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत आंदोलन छेडले. यावेळी ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’, ‘नरेंद्र मोदी हटाव, देश बचाव’ अशा घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या जेफरे एपस्टईन प्रकरणाशी जोडले जात असल्याचा आरोप केला. या संदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
तसेच अमेरिकेसोबत भारताने केलेल्या आर्थिक करारांबाबत आणि रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवर लक्ष ठेवण्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, विक्रांत गायकवाड, शाहिद शेख, यशपाल सोनकांबळे, सुहास सावंत यांच्यासह महिला आघाडी आणि युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment