लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे रानमसले येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय वडाळा आणि ग्रामपंचायत रानमसले यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल जीवन वेदा आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या माध्यमातून लोकमंगल समृद्ध गाव योजना आणि राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मौजे रानमसले ता. उत्तर सोलापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार, लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, लोकमंगल जीवन वेदा आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. अमजद बिजापुरे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा आशिष सरकाळे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोग्य तपासणी अंतर्गत गावातील नागरिकांना विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच औषध गोळ्यांची उपलब्धता करून देण्यात आली. या शिबिरात गावातील ज्येष्ठ नागरिकांनी उल्लेखनीय प्रतिसाद नोंदवून शिबिर आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. शिबिरामध्ये एकूण 40 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सदरील शिबिराच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या संपन्नतेसाठी लोकमंगल जीवनवेदा हॉस्पिटलचे डॉ. अमजद बिजापुरे, सौ मीनाक्षी इंगळे, सौ नंदा पवार आणि रमेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजन व संपन्नतेसाठी सर्व रासेयो स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका पार पाडली.

No comments:
Post a Comment