जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांचे निर्देश; सोमवार-गुरुवारी हजर राहा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांचे निर्देश; सोमवार-गुरुवारी हजर राहा

 जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांचे निर्देश; सोमवार-गुरुवारी हजर राहा




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- जिल्हा परिषदेच्या कामानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सोमवार व गुरुवार या दिवशी सर्व विभागप्रमुखांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयात उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिले.

बुधवारी विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर गुरुवारी ग्रामपंचायत, आरोग्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तसेच योजना विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते.

यापूर्वी जिल्हा परिषदेकडे असलेल्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या काही योजना राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्या योजना पुन्हा जिल्हा परिषदेकडेच राहाव्यात, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी शासन स्तरावर प्रयत्न करावेत, अशी सूचना करण्यात आली. या मागणीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष पवार यांनी स्पष्ट केले.

आरोग्य केंद्रे व अंगणवाड्या वीज बिलमुक्त करण्याचा प्रस्ताव

जिल्हा परिषदेच्या शाळा, आरोग्य केंद्रे व अंगणवाड्यांना येणाऱ्या वीज बिलाच्या समस्येवर उपाय म्हणून सौर पॅनल बसविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. याबाबत नियोजन करून चार टप्प्यांत काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

शाळांची स्वच्छता ग्रामपंचायतींकडून करण्याच्या सूचना

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई नसल्यामुळे स्वच्छतेची जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांवर येते. या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार संबंधित ग्रामपंचायतींनी आठवड्यातून किमान दोन दिवस उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून शाळांची स्वच्छता करावी, अशा सूचना उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages