अवकाळी पावसाने मोहोळ हादरला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ तालुक्याच्या पश्चिम भागाला बुधवारी (दि. २५) मध्यरात्री विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने तडाखा दिला. सुमारे तासभर सुरू असलेल्या या पावसासोबत अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे शेती पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तालुक्यातील देवडी, खंडाळी, पापरी, वाफळे, शेटफळ या भागात तुफान पाऊस व गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा यांसारखी रब्बी पिके आडवी झाली, तर द्राक्ष, केळी, आंबा यांसारख्या फळबागांचेही मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे अनेक झाडांची पाने गळून पडली असून काही झाडे उन्मळून पडली आहेत.
देवडी येथे नवीन घराचे बांधकाम सुरू असताना सुमारे सात फूट उंचीपर्यंत उभारलेल्या भिंती जोरदार वाऱ्यामुळे कोसळल्या. तसेच अनेक घरांवरील पत्रे व शेड उडून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. युवराज भोसले यांच्या शेतात विजेचा खांब कोसळून जर्शी गाय गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
सध्या काढणीला आलेली ज्वारी, गहू व हरभरा ही पिके शेतात कापून ठेवलेली असतानाच अचानक पावसाने हजेरी लावल्याने ती पूर्णपणे भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. द्राक्षबागा काढणीच्या अवस्थेत असतानाच गारपिटीमुळे नेस्तनाबूत झाल्याने उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. काही मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ सुरू करून नुकसानग्रस्त शेतकरी व बाधित नागरिकांना शासनाकडून त्वरित मदत व भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment