अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

 अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली




पंढरपूर (कटूसत्य वृत्त) :- पंढरपूर शहर व तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेती पिकांचे मोठे नुकसान केले. सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून फळबागांसह रब्बी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.

दिवसभर कडाक्याचे ऊन पडत असताना सायंकाळनंतर वातावरणात अचानक बदल झाला. आकाशात ढग दाटून येत विजांचा कडकडाट सुरू झाला. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पुळूज, करकंब, कासेगाव, खर्डी या द्राक्ष पट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.

यानंतर मध्यरात्रीनंतर पंढरपूर परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत दीड ते दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा, द्राक्षे, डाळिंब या फळबागांचे मोठे नुकसान झाले. आंब्याच्या बागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे कैऱ्यांचे खच पडले, तर द्राक्षे व बेदाणा उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

तसेच काढणीस आलेली गहू, मका, ज्वारी व तुरी पिके पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पंढरपूर शहरातही पावसाचा जोर मोठा होता. रस्त्यांवरून पाणी वाहत होते, तर रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याचीही नोंद झाली. पाऊस रात्रीच्या वेळी झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास झाला नाही; मात्र शेती पिके, फळबागा आणि जनावरांचे हाल झाले.

दरम्यान, गुरुवारीही वातावरण ढगाळ राहिल्याने पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages