सातही जागांवर विजय मिळवत जाधव पॅनलचे निर्विवाद वर्चस्व
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- येथील नामांकित श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत के. सर्जेराव जाधव विकास आघाडी पॅनलने सातही जागांवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विजयी उमेदवार पुढील तीन वर्षांसाठी संस्थेचा कारभार सांभाळणार आहेत.
या निवडणुकीत सात जागांसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. संस्थेच्या ६३ सभासद मतदारांपैकी ५६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता मतमोजणी पार पडली असून तीन फेऱ्यांमध्ये निकाल निश्चित झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीत सत्ताधारी आणि विरोधी पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली.
अखेर माजी आमदार टी. माने यांचे पुत्र तथा संस्थेचे माजी अध्यक्ष राजीव माने आणि विद्यमान संचालक बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखालील जाधव विकास पॅनलने बाजी मारली. विजयी उमेदवारांमध्ये तानाजी चव्हाण (२९), महादेव माने (३३), राजीव माने (३४), बाळासाहेब मोरे (२८), प्रकाश पडवळकर (३५), मिलिंद साळुंखे (३३) आणि विकास सुखसे (३१) यांचा समावेश आहे.
विरोधी श्री राजे फत्तेसिंह प्रगती पॅनलचे उमेदवार सुभाष गडसिंग (२०), विलास गव्हाणे (२४), सुधाकर गोंडाळ (२५), बाबासाहेब निंबाळकर (२५), दत्तात्रय पाटील (२७), माणिक साळुंखे (२२) आणि भीमराव साठे (२६) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पॅनलची धुरा माजी अध्यक्ष निंबाळकर व गव्हाणे यांनी सांभाळली होती.
निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी आसिफ शेख यांनी जाहीर केला. त्यानंतर त्यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या विजयात संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अॅड. शरद फुटाणे आणि ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
निकालानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी श्री फत्तेसिंह चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. काँग्रेसचे अरुण जाधव यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामीराय पाटील, सुरेश फडतरे, सोपानराव गडाळ, अमर पाटील, शंकर पवार, विठ्ठल मोरे, राजू मोरे, विवेक चव्हाण, तानाजी कावळे, प्रा. मनोज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सभासदांच्या विश्वासाला पात्र राहू - राजीव माने
मागील तीन वर्षांत संस्थेच्या हितासाठी केलेल्या कामांवर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवत पुढील काळातही संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू ठेवू, अशी भावना नूतन संचालक तथा माजी अध्यक्ष राजीव माने यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment