मंगळवार बाजारात अतिक्रमण कारवाई; सात खोकी जमीनदोस्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत मंगळवार बाजारातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सात खोकी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मंडई विभागाने दिलेल्या पत्रानुसार या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू करण्यात आली. मात्र, कोणते खोके अधिकृत आणि कोणते अनधिकृत याची स्पष्ट माहिती देण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने कारवाईदरम्यान गोंधळ निर्माण झाला.
कारवाई सुरू होताच अनेक खोकेधारकांनी जुने दंड भरल्याच्या पावत्या दाखवत आपले खोके अधिकृत असल्याचा दावा केला आणि कारवाई थांबवण्याची मागणी केली. मात्र, अतिक्रमण विभागाने कठोर भूमिका घेत ‘दंड भरल्याने कारवाई टाळता येणार नाही’ असे स्पष्ट करत कारवाई सुरूच ठेवली.
या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. उन्हाच्या कडाक्यात पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. काही खोक्यांमध्ये बेकायदेशीर वीज जोडणी आढळून आल्याने महावितरणला कळवून संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. तसेच काही खोक्यांमध्ये ठेवलेल्या शेळ्यांना बाहेर काढताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
या संपूर्ण घटनेत प्रशासनातील समन्वयाचा अभाव प्रकर्षाने दिसून आला असून स्थानिक अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अतिक्रमण विभाग-मंडई विभागात समन्वयाचा अभाव
यापूर्वी अक्कलकोट रस्त्यावरील कारवाईदरम्यान तणाव निर्माण झाल्याने झोन कार्यालयाकडून संबंधितांना ३१ मार्चपर्यंत अतिक्रमण काढण्याची मुदत देण्यात आली होती. यावरून अतिक्रमण विभाग व झोन अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. आता मंगळवार बाजारातील कारवाईवेळी मंडई विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने अतिक्रमण विभाग व मंडई विभागातही वाद निर्माण झाला असून प्रशासनातील समन्वयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
.png)
No comments:
Post a Comment