गॅस टंचाई की व्यवस्थेचा गोंधळ? नागरिक त्रस्त, उत्तर मात्र ‘अफवा
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी शहरात सध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईची चर्चा जोरात आहे. शहरातील भारत गॅस एजन्सी सलग तीन दिवस बंद असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून “अफवांवर विश्वास ठेवू नका” असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रशासनाचे म्हणणे योग्य असले तरी जमिनीवरील वास्तवही तितकेच महत्त्वाचे आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे एकच — त्यांच्या स्वयंपाकघरात वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होणे. एजन्सी बंद असल्याने अनेक कुटुंबांची गैरसोय झाली आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
तहसीलदार एफ. आर. शेख यांनी संयम राखण्याचे आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २४x७ आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तक्रारींसाठी दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. ही सकारात्मक बाब असली तरी त्या यंत्रणेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कितपत मिळतो, याचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
दरम्यान, अनेक ग्राहकांनी गॅससाठी नंबर लावूनही अनेक दिवस उलटले तरी त्यांना सिलिंडर मिळालेला नाही. काही नागरिक एजन्सी कार्यालयात चौकशीसाठी गेले असता “तुमची टाकी दुसऱ्या कोणाला तरी दिली गेली असेल”, “KYC केली आहे का?”, “तीन दिवसांनी या” अशा प्रकारची टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये अधिकच संभ्रम आणि नाराजी निर्माण होत आहे.
अशा वेळी प्रशासनाने केवळ आवाहन न करता पारदर्शक संवाद साधणे गरजेचे आहे. गॅस एजन्सी बंद का आहे? पुरवठा कधी सुरळीत होणार? पर्यायी व्यवस्था काय? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे नागरिकांना मिळाली तर अफवांना आपोआप आळा बसेल. माहितीच्या अभावातूनच अफवा जन्म घेतात.
नागरिकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. गरजेपेक्षा जास्त साठा करणे, सोशल मीडियावर अप्रमाणित संदेश पुढे पाठवणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. संयम आणि सहकार्य हीच या तात्पुरत्या संकटातून बाहेर पडण्याची गुरुकिल्ली आहे.
आजची गरज आहे ती विश्वास निर्माण करण्याची. प्रशासनाने वेळेवर आणि स्पष्ट माहिती द्यावी, तर नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. अफवा आणि वास्तव यामधील सीमारेषा स्पष्ट ठेवली तरच सोलापूर जिल्ह्यातील गॅस टंचाईचा प्रश्न लवकर मार्गी लागू शकेल.

No comments:
Post a Comment