राज्यस्तरीय ‘चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26’ चे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

राज्यस्तरीय ‘चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26’ चे आयोजन

राज्यस्तरीय ‘चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26’ चे आयोजन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव (सोलापूर) आणि यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला राज्यस्तरीय ‘चाचा नेहरू बालमहोत्सव 2025-26’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव 28 ते 30 मार्च दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्रशस्त मैदानावर उत्साहात पार पडणार आहे.
या महोत्सवात विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश करण्यात आला असून, धावणे (रनिंग), लांब उडी, रिले, कबड्डी, खो-खो यांसारख्या खेळांसह चित्रकला, निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर आणि समूह नृत्य अशा विविध स्पर्धा तीन दिवस रंगणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून सहभागी होणाऱ्या बालकांना या माध्यमातून आपली कला व क्रीडा प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (28 मार्च) सायंकाळी 5 वाजता होणार असून, महिला व बालविकास विभाग (महाराष्ट्र राज्य) चे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुक्त नयना गुंडे राहणार असून, प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांची उपस्थिती राहणार आहे.
या पहिल्या राज्यस्तरीय बालमहोत्सवात महिला व बालविकास विभाग अंतर्गत 36 जिल्ह्यातील कार्यरत विविध बालगृहातील सुमारे 900 स्पर्धक सहभागी होणार असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण 1200 जणांचा सहभाग अपेक्षित आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. या महोत्सवाचे नियोजन संजय माने (मुख्य कार्यक्रमाधिकारी तथा विभागीय उपआयुक्त, महिला व बालविकास, पुणे विभाग – नोडल अधिकारी) तसेच डॉ. विजय खोमणे (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये यापूर्वीही अशा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच पहिला राज्यस्तरीय बाल महोत्सव आयोजित करण्याचा मान  सोलापूर जिल्ह्याला मिळालेला आहे. सुमारे 90 एकर परिसरात विस्तारलेला सुसज्ज कॅम्पस, प्रशस्त मैदान, उत्तम पायाभूत सुविधा आणि पार्किंग व्यवस्था यामुळे शासनाच्या विविध कार्यक्रमांसाठी या संस्थेला नेहमीच प्राधान्य दिले जाते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages