पोलिसांशी झटापट करत फेरीवाल्यांचा महापालिकेवर मोर्चा
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील फळ-भाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेधारक व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी सीटू संलग्न हॉकर्स युनियनच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ जोरदार धक्काबुक्की झाली.
सीटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख आणि राज्य उपाध्यक्ष कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली. दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर प्रशाला व श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे हा मोर्चा सोलापूर महानगरपालिकेकडे निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलिसांनी मोर्चाला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पकडणे व धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेला व जोरदार घोषणाबाजी केली.
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दरम्यान, महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ढवळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी बोलताना कॉ. एम.एच. शेख यांनी सांगितले की, केंद्र सरकारने Street Vendors (Protection of Livelihood and Regulation of Street Vending) Act, 2014 तसेच Deendayal Antyodaya Yojana – National Urban Livelihoods Mission अंतर्गत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू केले आहे. या कायद्यानुसार फेरीवाले, हातगाडीधारक व पथविक्रेत्यांचे संरक्षण करणे, त्यांना ओळखपत्र देणे तसेच हॉकर्स झोन निश्चित करणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे.
कॉ. युसुफ शेख (मेजर) म्हणाले की, सोलापूरमध्ये उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारी वाढली असून अनेक नागरिक भाजीपाला, फळे व किरकोळ वस्तू विकून उदरनिर्वाह करत आहेत. शहरात सुमारे ६१३० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यांना ओळखपत्र व हॉकर्स झोन निश्चित करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
मोर्चाद्वारे फेरीवाल्यांना अधिकृत ओळखपत्र व विक्री प्रमाणपत्र देणे, शहराच्या लोकसंख्येच्या किमान २.५ टक्के फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देणे, पथविक्रेता समितीची तातडीने बैठक घेणे, फेरी परवाना शुल्क ₹५००० ऐवजी ₹६०० करणे, भाजी मंडईतील दररोजची ₹२५ फी कमी करून ₹१० करणे तसेच अधिकृत हॉकर्स झोन निश्चित होईपर्यंत अतिक्रमण कारवाई थांबविणे आदी मागण्या करण्यात आल्या.
राष्ट्रीय फेरीवाला कायदा व शासन निर्णयानुसार या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. नसीमा शेख, ॲड अनिल वासम कॉ. सुनंदाताई बल्ला, कॉ. एम. हनीफ सातखेड, कॉ. रंगप्पा मरेड्डी यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते.
सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. दाउद शेख, कॉ. खाजाभाई करजगी, कॉ. नरेश दुगाणे, अशोक बल्ला, कॉ. शहाबुद्दीन शेख, जावेद सगरी, चांद शेख, जाफर शेख, गणेश वाघमारे, शांताबाई कोळी, अकिल शेख, असिफ पठाण, रहीम नदाफ, अमीन शेख, प्रशांत चौगुले, राजेश काशीद, भारत पाथरूट, प्रकाश कलबुर्गी , प्रदीप मरेड्डी आदींनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment