कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही?” मराठा आमदारांना जाब विचारा – जरांगे पाटील
लातूर (कटूसत्य वृत्त) :- मराठा समाजाला आरक्षणासाठी आवश्यक असलेली कुणबी प्रमाणपत्रे तात्काळ देण्यात यावीत, अन्यथा सहकार्य न करणाऱ्या आमदारांना 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते यांनी केले. लातूर जिल्ह्यातील माकणी येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी मराठा समाजाला आपल्या मतदारसंघातील आमदारांना जाब विचारण्याचे आवाहन केले.
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला गेल्या सत्तर वर्षांत जे मिळाले नाही, ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून मिळवून दिले आहे. राज्यभरात मराठा समाजाच्या वंशावळीशी संबंधित सुमारे ५८ लाख नोंदी सापडल्या असून त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने मराठा समाजाच्या नोंदींवर आधारित प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय (GR) काढला आहे. तरीही अनेकांना अद्याप प्रमाणपत्र मिळत नसल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “तुमच्या सरकारने जीआर काढला आहे, मग आमच्या मुलांना प्रमाणपत्र का मिळत नाही?” असा सवाल करत त्यांनी आमदारांनी प्रशासनावर दबाव आणून प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी केली.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, तहसीलदार आणि एसडीओ कार्यालयांमध्ये जाऊन पाठपुरावा करा, त्यांना फोन करून प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया जलद करण्यास सांगा. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी ही प्रमाणपत्रे अत्यंत आवश्यक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सहकार्य न करणाऱ्या आमदारांविरोधात तीव्र भूमिका घेण्याचा इशारा देत त्यांनी सांगितले की, “ज्या आमदारांनी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली नाही, त्यांना 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करा.” समाजाच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता धडा शिकवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात राजकारणापासून दूर राहण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. “आम्हाला राजकारणाचा नाद नाही. असता तर मागील विधानसभा निवडणुकीतच आम्ही धुराळा उडवला असता,” असे ते म्हणाले. मात्र मराठा समाजातील गरीब कुटुंबांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी प्रमाणपत्र मिळवून देणे ही सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील सर्व आमदारांनी तहसीलदार, एसडीओ आणि जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण गतीमान करावे, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या समाजाने आपल्याला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठा समाज मोठा असून त्याच्याविरोधात असणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी समाजाने संयम आणि एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. “उद्यापासून आपल्या मतदारसंघातील आमदारांना जाब विचारा आणि आपल्या मुलांसाठी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा,” असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.
दरम्यान, मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment