सोलापुरात गॅस सिलिंडरची 'अंत्ययात्रा'
आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा निषेध
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गॅस सिलिंडर दरवाढ आणि टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला विरोध करत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅस मिळण्यात अडचणी वाढल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर महागाईच्या थैमानाने सामान्य जनतेच्या जीवनावर झालेल्या परिणामाची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसने एक अनोखा आणि प्रभावी आंदोलन केले.
प्रतिकात्मक अंत्ययात्रा
काँग्रेस भवनाच्या परिसरातून सुरू झालेल्या या आंदोलनात एका गॅस सिलिंडरला हार घालून त्याला तिरडीवर ठेवण्यात आले. नंतर ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आली. तिरडीसोबत काँग्रेस कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. वाढत्या महागाईमुळे गरिब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिवसेंदिवस आर्थिक ओझे वाढत असल्याचा आरोप करत या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारला कडक संदेश देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात एकत्र येत निषेध व्यक्त केला. "गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाले असताना दरवाढ करणे ही जनतेविरोधी कारवाई आहे," असे मत नरोटे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामुळे आंदोलनाला अधिक व्यापकता मिळाली आहे.
गॅस दरवाढीच्या मुद्द्याला आता राजकीय रंग
देशातील गॅस दरवाढीच्या मुद्द्याला आता राजकीय रंग चढवल्या जात आहेत. काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा असे आंदोलन राज्यभर विस्तारित करण्यात येईल. या निषेध मोर्चामुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मात्र, शांततेत आंदोलन संपन्न झाले.

No comments:
Post a Comment