अकलूज येथील बैलगाडा शर्यतीत लखन - सर्जाने मारली बाजी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 17, 2026

अकलूज येथील बैलगाडा शर्यतीत लखन - सर्जाने मारली बाजी

 अकलूज येथील बैलगाडा शर्यतीत लखन - सर्जाने मारली बाजी





अकलूज (कटूसत्य वृत्त):- पंचांची शिट्टी वाजली. कासऱ्याला झटका बसला. सळसळणाऱ्या पायात वीज संचारली. क्षणात रगेल, मस्तवाल, ताकतवान बैलांनी झेप घेऊन दौडायला सुरुवात केली. बैलगाड्यांचा तो अफाट वेग पाहून प्रेक्षक भान हरपून गेले. शिट्ट्या, आरोळ्यांबरोबर टोप्या, गमजे हवेत भिरकावले गेले. सीमेवरची पांढरी रेषा लखन आणी सर्जा या चपळ आणी बलदंड जोडीने पार करताच प्रेक्षकांनी प्रचंड कल्ला केला. गुलाल हवेत उधळला गेला. फटाक्यांची आतशबाजी सुरु झाली. आणी सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यत वाशीमच्या लखन आणी सर्जा बैलजोडीने जिंकल्याचे जाहीर करण्यात आले. 

शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या गाडी मालक मनोहर पाटील व साईनाथ पाटील यांना रोख रु.१ लाख ५० हजार व चषक बक्षीस तर बैलांना मानाची झुल, बाशिंग, शेंब्या, तुळशी हार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अकलूज-चाकोरे रोडवर आनंदनगर येथे श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टच्यावतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सहकार महर्षी केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामधे राज्यभरातील ३७२ बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. १० ओळीत स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीत ७ बैलगाडा सोडण्यात येवुन फेरीतील प्रथम क्रमांकाच्या बैलजोडी निवडुन उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत ८ बैलगाड्या सोडण्यात आल्या. अंतिम फेरीतील बैलजोडी लक्ष्मण-सावकार (मालक नवनाथ जगदाळे व भारत वळकुंडे) वळकुंड (व्दितीय), बैलजोडी साई-अर्जुन मालक कार्तिक वावरे माळशिरस व अवतार पवार अंबड जालना (तृतीय), बैलजोडी सर्जा-रायफल मालक रणजित निंबाळकर साखरवाडी व आरोही घाडगे शिरसवाडी (चतुर्थ), चिक्या-बकासुर मालक मोहीत धुमाळ सुसगाव व अजित जगताप कारुंडे (पाचवा), बैलजोडी बुलेट- राजा मालक निखिल कोरडे खडकवासला व योगेश भगत शिरसूफळ (सहावा), बैलजोडी छावा-बदाम मालक विक्रम गोरे बागेहल्ली अक्कलकोट व तस्मिय्या सय्यद (सातवा), बैलजोडी चिक्या- नाथा मालक आशुतोष जाधव कलेढोण व वाशीम एक्स्प्रेस कराड (आठवा) यांना अनुक्रमे १ लाख १० हजार, ७१ हजार, ६१ हजार, ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार, ११ हजार व स्मृती चिन्ह देण्यात आले.

यावेळी नंदिनीदेवी मोहिते पाटील, संयोजक मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, खा.धैर्यशील मोहिते पाटील, जि.प.सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील, भाऊसाहेब आंधळकर, सचिव राजेंद्र काकडे, विश्वस्त चंद्रकांत कुंभार, श्रीकांत राऊत, वसुंधरा देवडीकर यांच्यासह प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages