चिंचेची मोठी आवक; मात्र अपेक्षित दर मिळेना
शेतकऱ्यांत नाराजी – बाजार समितीच्या हस्तक्षेपाची मागणी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त): अक्कलकोट तालुक्यात सध्या चिंचेची मोठ्या प्रमाणात आवक होत असून दर शनिवारी कांदा बाजारात चिंचेचा लिलाव पार पडत आहे. मात्र या लिलावातून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे हा लिलाव अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत न होता खाजगी दलालांकडून होत असल्याने शेतकरी वर्गाने बाजार समितीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. दर आठवड्याला एक हजाराहून अधिक पोत्यांची आवक होत असली तरी नजीकच्या बाजारपेठांच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याची तक्रार आहे. सध्या चिंचेला प्रतिक्विंटल सुमारे १,५०० ते ३,५०० रुपये दर मिळत आहे.
पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे होती. त्यांचा लिलाव शासनाकडून केला जात असे. मात्र अनेक रस्ते राष्ट्रीय महामार्गांत वर्ग झाल्यानंतर झाडांची संख्या कमी झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः चिंच लागवडीवर भर दिला असून सध्याची मोठी आवक त्याचेच द्योतक आहे.
पोटनियमात तरतूद नसल्याने अडचण
अक्कलकोट बाजार समितीच्या पोटनियमात भाजीपाला व फळपिकांच्या लिलावाची तरतूद नसल्याने अधिकृत लिलाव व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी खाजगी दलालांमार्फत व्यवहार होत असून शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
“बाजार समिती ही शेतकरी व व्यापारी यांच्यातील दुवा आहे. पणन विभागाच्या मार्गदर्शनाखाली भाजीपाला व फळांच्या अधिकृत लिलावासाठी पोटनियमात आवश्यक तरतूद करण्यात येईल,” असे आश्वासन बाजार समितीचे सचिव सिद्धेश्वर कुंभार यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, श्री बसवेश्वर मार्केट यार्डात सध्या भाजीपाला व फळपिकांचे लिलाव होत नाहीत. मात्र संचालक मंडळाशी चर्चा करून लवकरच पोटनियमात आवश्यक दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, बासलेगाव येथील चिंच उत्पादक शिवपुत्र बिराजदार यांनी सांगितले की, “दर आठवड्याला मोठी आवक होत असली तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत म्हणावा तसा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना अधिक दर मिळणे गरजेचे आहे.”
दरवाढ व अधिकृत लिलाव यंत्रणेच्या मागणीमुळे आता बाजार समितीची भूमिका काय राहणार, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment