लोकसभेतील आकडा वाढविण्यासाठीच भाजपकडून पक्षफोडी : सुजात आंबेडकर
राष्ट्रवादीच्या आठ खासदारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीवरून भाजपसह शरद पवारांवर निशाणा
सोलापूर (कटूसत्य वृत्तसेवा) : देशातील छोटे-मोठे पक्ष फोडून लोकसभेतील संख्याबळ वाढविण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पक्षफोडीचे हे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. खासदार सुप्रिया सुळे आपल्या आठ खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. ही भेट डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात चर्चेसाठी असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात संसदेत हे विधेयक मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार कोणाच्या बाजूने मतदान करतात, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
जंतर-मंतर लाठीचार्जवरून गंभीर आरोप
जंतर-मंतर येथे झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरूनही सुजात आंबेडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. “जंतर-मंतरवरील लाठीचार्ज हा अमित शहा यांच्या इशाऱ्यावर झाला,” असा दावा त्यांनी केला. या घटनेत भाजपचे भाडोत्री गुंड सहभागी असल्याचाही आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शरद पवार यांची पुरोगामी भूमिका सुरुवातीपासूनच बेगडी आणि नाटकी असल्याचा आरोप त्यांनी केला.
पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख
२०१९ मधील पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत आंबेडकर म्हणाले की, “पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाला होता.” तसेच २०१४ मध्ये भाजपला सत्ता स्थापनेसाठी पुरेसे समर्थन मिळत नसताना शरद पवार यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्यात आला, असा दावाही त्यांनी केला.
शरद पवार यांची पुरोगामी भूमिका ही नेहमीच नाटकी आणि खोटी राहिली असल्याचे सांगत आंबेडकर यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली.
No comments:
Post a Comment