आरोग्य विज्ञान विद्यापीठात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
महिलांनी नियमित तपासणी व लसीकरण करणे गरजेचे
- कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रणजीत जोशी यांचे प्रतिपादन
नाशिक (कटूसत्य वृत्त):- महिलांनी नियमित तपासणी व लसीकरण करणे करजेचे असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रणजीत जोशी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिलांचे आरोग्य, सुरक्षा आणि त्यांचे समाजातील योगदान यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे, विद्यापीठाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती जाधव, सचिव श्रीमती शिल्पा पवार, सदस्य श्रीमती ज्योती ईटनकर, श्री. हेमंत कर्डक, श्रीमती निता बैरागी, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रणजीत जोशी, योगतज्ज्ञ डॉ. किरण जैन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रणजीत जोशी यांनी सांगीतले की, भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे. पण सकारात्मक बाब ही आहे की, योग्य माहिती आणि वेळेवर काळजी घेतल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येऊ शकतो. हा कर्करोग गर्भाशयाच्या खालच्या भागात, म्हणजेच ’सर्व्हिक्स’मध्ये होतो. याचे मुख्य कारण ’हयुमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV) हा विषाणू आहे. हा विषाणू अत्यंत सामान्य आहे, परंतु जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते, तेव्हा तो कर्करोगाचे रुप घेऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की, कर्करोगाला रोखण्यासाठी उपययोजना करणे गरजेचे आहे. भ्च्ट लसीकरण ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना लस देणे सर्वात प्रभावी ठरते. ही लस भविष्यात होणाऱ्या कर्करोगाचा धोका ९० टक्के पर्यंत कमी करते. पॅप स्मिअर टेस्ट (Pap Smear Test) ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने दर ३ ते ५ वर्षांनी ही चाचणी करुन घ्यावी. यामुळे कर्करोग होण्यापूर्वीच्या पेशींमधील बदल (Pre-cancerous stage) वेळेत ओळखता येतात.महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग रहावे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी योगतज्ज्ञ डॉ. किरण जैन यांनी सांगितले की, योगाचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. रोज योग अभ्यास केल्याने माणूस ताणतणावपासून दूर राहतो. हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहतात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. पण त्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहतो. त्यामुळे नियमित व्यायाम व योगअभ्यास केल्याने बऱ्याचशा आजारांना आपण दूर ठेवू शकतो असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिटे ध्यान लावून बसले की, माणसाच्या मनात आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे माणसाचे मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. तसेच पूर्ण दिवस मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढून योगा करावा व आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करावे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, केवळ पदव्या मिळवणे म्हणजे सक्षमीकरण नाही, तर आव्हानात्मक परिस्थितीत स्वतःला सिध्द करणे ही खरी शक्ती आहे. आरोग्य क्षेत्रातील महिलांनी चिकाटी आणि सेवाभावाचा जो आदर्श ठेवला आहे, तो अतुलनीय आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वित्त व लेखाधिकारी श्री. बोधिकिरण सोनकांबळे यांनी सांगितले की, कुटुंबाचे बजेट सांभाळण्यापासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत महिलांचा सहभाग आज मोलाचा ठरत आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, विद्यापीठ स्तरावर ’महिला तक्रार निवारण समिती’ ही केवळ तक्रारी सोडवण्यासाठी नाही, तर महिलांना निर्भयपणे काम करता येईल असे वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुश्री नेटके यांनी केले तसेच आभार प्रदर्शन महिला तक्रार निवारण समितीच्या सचिव श्रीमती शिल्पा पवार यांनी केले. यावेळी विद्यापीठातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतातील विविध प्रांतातील महिला वेशभूषा करुन सादरीकरण केले तसेच पोस्टर सादरीकरण केले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील महिला अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment