संभाजीनगरात १४ व १५ मार्च रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन, दर्शन व प्रवचन सोहळा ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

संभाजीनगरात १४ व १५ मार्च रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन, दर्शन व प्रवचन सोहळा !

 संभाजीनगरात १४ व १५ मार्च रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन, दर्शन व प्रवचन सोहळा ! 



कळंब (कटूसत्य वृत्त):-
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचा समस्या मार्गदर्शन, दर्शन व प्रवचन सोहळा दि. १४ व १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता म्हसोबा मंदिराजवळ, जळगाव रोड, चौका, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला असून यामध्ये हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमात जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भाविकांना जीवनातील विविध समस्या, आध्यात्मिक मार्गदर्शन तसेच समाजहिताचे विचार मांडणार आहेत. यावेळी भाविकांना महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचीही संधी उपलब्ध होणार आहे.
संस्थानाच्या माध्यमातून समाजोपयोगी अनेक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, आरोग्य उपक्रमांतर्गत मोफत दवाखाने, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन असे विविध सामाजिक उपक्रम संस्थानाच्या माध्यमातून राबवले जातात.
महिला सक्षमीकरणासाठी मोफत शिलाई मशीन वाटप, मोफत घरघंटी वाटप, तसेच गरजूंना आपत्कालीन मदत, कायदेविषयक साक्षरता शिबिरे अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य संस्थान करत आहे.
रक्तदान चळवळीतही संस्थान अग्रेसर असून जानेवारी २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांद्वारे अवघ्या १५ दिवसांत तब्बल १ लाख ७१ हजार १५० रक्तकुप्यांचे संकलन करून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच “एक पेड गों के नाम” या वृक्षारोपण उपक्रमांतर्गत नोव्हेंबर २०२५ मध्ये १ लाख १० हजार ६८७ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी संस्थानच्या वतीने राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांवर ५३ मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू असून आतापर्यंत ३१ हजारांहून अधिक जखमींचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. तसेच “ब्लड इन नीड” या उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांना थेट रुग्णालयात जाऊन आतापर्यंत २५ हजारांहून अधिक रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय सप्टेंबर २०१६ ते मार्च २०२६ या कालावधीत १८३ मरणोत्तर देहदान आणि १३१ मरणोत्तर अवयवदान करून समाजसेवेचा आदर्श संस्थानने निर्माण केला आहे.
या कार्यक्रमादरम्यान दि. १४ मार्च रोजी साधक दीक्षा तर दि. १५ मार्च रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या दीक्षा कार्यक्रमासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दोनही दिवस कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाडा उपपीठ अंतर्गत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, साधक, शिष्य व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा पीठ समिती व धाराशिव जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages