सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा!
गळती दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा पुन्हा एक दिवस पुढे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एकीकडे शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती कामासाठी परवानगी दिल्यानंतर गळती लागलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात येत असल्याने पाण्याचा पुरवठा रोखण्यात येणार आहे.
यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एका रोटेशनसाठी एक दिवसाने पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा अंतर्गत जुळे सोलापूर एम. बी. आर. उंचावरील टाकीवरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पिण्याची पाईपलाईनआसरा पुलालगत कल्याण नगर जवळ रेल्वे रुळाशेजारी नादुरुस्त झाली आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.
या गळती दुरुस्तीचे काम रेल्वे विभागाच्या संमतीने सोमवार, २३ मार्च रोजी सोलापूर महापालिकेमार्फत हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्यामुळे जुळे सोलापूर एम. बी. आर. उंचावरील टाकीवरून २३ मार्चपासून होणारा पाणीपुरवठा एक रोटेशन एक दिवसाने पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन देखील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा यापुढे विस्कळीत राहणार आहे.

No comments:
Post a Comment