आज निकाल; सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 9, 2026

आज निकाल; सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार

 आज निकाल; सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार



 मिनीमंत्रालयावर कोणाची सत्ता येणार याकडे जिल्ह्याचे लक्ष

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच तालुक्यांत चुरशीचे वातावरण असून सरासरी सुमारे ७० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक प्रशासनाने व्यक्त केला आहे. उशिरापर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी नोंदविण्याचे काम सुरू होते.
या निवडणुकीत जिल्हा परिषद गटासाठी २७१ उमेदवार, तर पंचायत समिती गणासाठी ४८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. सोमवारी मतमोजणी होणार असून जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक ठिकाणी तरुण मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला.
काही ठिकाणी किरकोळ प्रकार
माढा तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर सकाळी ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र तात्काळ मशिन बदलण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गटातील मुळेगाव येथील मतदान केंद्रावर अज्ञात व्यक्तीने ईव्हीएम मशीनच्या शेजारी लिंबू-मिरची ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील मतदान केंद्रावर एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान यंत्राचे बटन दाबण्यास सांगितल्याचा आरोप झाला. यावर विरोधी उमेदवार व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
शहरातील मतदारांसाठी विशेष व्यवस्था
ग्रामीण भागातील उमेदवारांनी शहरात वास्तव्यास असलेल्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी विशेष वाहतुकीची व्यवस्था केली होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली.
सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी मतदान केंद्रात वेळेत प्रवेश केलेल्या मतदारांना मतदानाची मुभा देण्यात आली. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर सायंकाळी ६.२५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.
६८ जिल्हा परिषद व १३६ पंचायत समिती सदस्यांची निवड
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ६८ सदस्यांचा तसेच पंचायत समितीच्या १३६ सदस्यांचा फैसला मतदारांनी मतदानातून केला आहे.

मिनीमंत्रालयावर कोणाची सत्ता?
मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यंदा विविध पक्षांचे मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात आहेत.
भाजप – ५९ उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – २६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – २४
शिवसेना (शिंदे गट) – २२
काँग्रेस – १८
वंचित बहुजन आघाडी – ६

भाजप पुन्हा एकदा सत्ता मिळवणार की स्थानिक आघाडीला संधी मिळणार, याचा फैसला सोमवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages