‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’चे सोलापुरात भव्य आगमन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 3, 2026

‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’चे सोलापुरात भव्य आगमन

 ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’चे सोलापुरात भव्य आगमन


समता सभेतून सामाजिक सलोख्याचा जागर, समाजप्रबोधन पुरस्कारांचे वितरण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ या राज्यव्यापी सामाजिक प्रबोधन उपक्रमाचे आज सायंकाळी हुतात्मा नगरी सोलापूर येथे उत्साहात आगमन झाले. या निमित्ताने शिवस्मारक, सोलापूर येथे समता सभा व ह.भ.प. रखमाजी भालेराव समाजप्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र, वृंदावन फाउंडेशन व ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ मध्यवर्ती संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही आठव्या वर्षातील समता वारी असून, रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत चोखामेळा महाराजांच्या कर्मभूमी मंगळवेढा येथून या वारीचे प्रस्थान झाले आहे. संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळ्याने या वारीचा शुभारंभ करण्यात आला असून, सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जगद्गुरु संत तुकोबाराय महाराजांच्या जन्मभूमी देहूगाव येथे या वारीचा समारोप होणार आहे.
ही समता वारी सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अहिल्यानगर व पुणे अशा ९ जिल्ह्यांतून सुमारे १७५० किलोमीटरचा प्रवास करीत आहे. या प्रवासादरम्यान समाजातील वाढती विषमता, जातीयवाद, धार्मिक विद्वेष, नक्षलवाद व दहशतवाद यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर सकारात्मक व वैचारिक प्रबोधन करण्यात येत आहे.
सोलापूर येथील कार्यक्रमास माजी खासदार सुनीलराव गायकवाड, संत साहित्याचे अभ्यासक व समता वारीचे प्रणेते सचिन पाटील, डॉ. लक्ष्मण हेंबाडे, ज्येष्ठ कवी फुलचंद नागटिळक, सविता भालेराव, प्राचार्य सिद्धाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ह.भ.प. रखमाजी भालेराव समाजप्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये सद्गुरु गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, सोनाली निकम (क्रीडा), सिद्रामप्पा पाटील (शिक्षण), रेणुकाताई सुतार (आरोग्यसेवा) व परमेश्वर चव्हाण (बालक सेवा व समाजसेवा) यांचा समावेश होता.
सुनीलराव गायकवाड :- 
“आज समाजात वाढत चाललेली दरी ही केवळ आर्थिक नाही, तर ती वैचारिक आहे. अशा काळात संत चोखामेळा आणि संत तुकोबाराय यांनी दिलेला समतेचा विचार समाजाला एकत्र आणणारा आहे. ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ हा उपक्रम म्हणजे समाजाला विवेकाची दिशा देणारी चळवळ आहे. या वारीमधून निर्माण होणारी सामाजिक जाणीव हीच खरी राष्ट्रसेवा आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार सुनीलराव गायकवाड यांनी केले.
सचिन पाटील :- 
“ही वारी म्हणजे केवळ पायी चालणारा प्रवास नाही, तर विचारांची, माणुसकीची आणि समतेची यात्रा आहे. संत चोखामेळा व संत तुकोबाराय यांच्या विचारांवर आधारित हा वारीमार्ग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, हा आमचा ध्यास आहे. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन ‘आपण सर्व भारतीय आहोत’ हा विचार समाजमनात रुजवणे, हेच या समता वारीचे अंतिम उद्दिष्ट आहे,” असे समता वारीचे प्रणेते सचिन पाटील यांनी सांगितले.कार्यक्रमाचे निवेदन प्रो. निलोफर बागवान व प्रो. अशोक कदम यांनी केले.
यावेळी दत्ता वाघमारे, अविनाश अभंगराव, महादेव ढेंबरे, अ‍ॅड. रोहित मुंडे, आशिष यादव, तानाजी चिलवंत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता, बंधुता, स्वातंत्र्य व मानवता या वारकरी संतांनी दिलेल्या मूल्यांचा जागर करणारी ही वारी समाजात संवाद, सलोखा आणि समतेची नवी दृष्टी निर्माण करीत असल्याचे चित्र सोलापूर येथील समता सभेतून स्पष्टपणे दिसून आले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages