ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांना 'राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांना 'राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर

 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांना 'राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार' जाहीर



रत्नागिरी (कटूसत्य वृत्त):- रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा 'राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार २०२६' ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राथमिक शिक्षक श्री. गुलाबराव आप्पासो पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. ग्रंथालय चळवळीतील त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. पाटील यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना समाजप्रबोधन, वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि ज्ञानचळवळीच्या विस्तारासाठी स्वतःला पूर्णतः वाहून घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील स्वामी विद्यानंद सार्वजनिक वाचनालय, ओलेगावचे संस्थापक अध्यक्ष म्हणून १९९४ पासून त्यांनी ग्रंथालयाच्या उभारणीत आणि सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
केवळ एका वाचनालयापुरते मर्यादित न राहता, त्यांनी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, पुणे विभाग ग्रंथालय संघ आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ या संघटनांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, संचालक व निमंत्रित सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून ग्रंथालय चळवळीला व्यापक दिशा दिली आहे. याशिवाय सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजहिताचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघ व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हा सोहळा शनिवार दि. २१ फेब्रुवारी व रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर स्टॉप, नाचणे, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण सावणे आणि प्रमुख कार्यवाह श्री. महेंद्र दळवी यांनी या निवडीची माहिती दिली असून, श्री. पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages