अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; “घातपाताची शक्यता, सीबीआय चौकशी आवश्यक” - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 28, 2026

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; “घातपाताची शक्यता, सीबीआय चौकशी आवश्यक”

 अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; “घातपाताची शक्यता, सीबीआय चौकशी आवश्यक”





मुंबई (कटूसत्य वृत्त) :- राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक दावे करत “हा अपघात सूनियोजित घातपात असू शकतो” अशी शंका व्यक्त केली आहे. अपघाताला आज एक महिना पूर्ण होत असताना तपास अद्याप अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली.


महाराष्ट्र विधानसभा परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना मिटकरी म्हणाले की, अपघाताच्या वेळी विमान अचानक रडारवरून गायब झाले. लँडिंग गिअरमध्ये छेडछाड झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच इंधनात काही घटक मिसळल्याने इंजिन बंद पडले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. “ही केवळ दुर्घटना नसून यामागे नियोजन असू शकते. त्यामुळे प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.


मिटकरी यांनी आणखी एक खळबळजनक दावा करत अपघातातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. “तो सध्या कॅलिफोर्नियात असल्याची चर्चा आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच, नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने सुरुवातीला विमानात सहा जण असल्याचे सांगितले होते; मात्र नंतर फक्त पाच मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली, यातील विसंगती गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच, शांभवी पाठक विमान चालवत होती का, हा मुद्दाही तपासात विचारात घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.


मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या काही तास आधी बारामती धावपट्टी आणि हँगर परिसरात काही अज्ञात व्यक्ती दिसल्या होत्या. त्या विमानतळाच्या अधिकृत कर्मचाऱ्यांमध्ये नव्हत्या, असा दावा त्यांनी केला. सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ देत या हालचालींची गंभीर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.


या प्रकरणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असल्याचे मिटकरी यांनी सांगितले. “रोहित पवार जे मुद्दे मांडत आहेत, त्यामागे ठोस कारणे आहेत. सत्य बाहेर यावे, हीच आमची भूमिका आहे,” असे ते म्हणाले.


संबंधित तपास राज्य सीआयडीकडून सुरू असून, अपघातानंतर सापडलेल्या ब्लॅक बॉक्सबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. सुरुवातीला तो जळालेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले; मात्र नंतर तो सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


“घातपात की दुर्दैवी अपघात?”


अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य येणे अत्यावश्यक आहे. “हा घातपात होता की दुर्दैवी अपघात, हे स्पष्ट झाले पाहिजे. पारदर्शक चौकशीशिवाय शंका कायम राहतील,” असे ते म्हणाले.


दरम्यान, मिटकरी यांच्या दाव्यांमुळे राज्यातील राजकारणात “भूकंप” झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी या प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. अधिकृत तपास अहवाल येईपर्यंत या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही; मात्र या प्रकरणाने राजकीय तापमान निश्चितच वाढवले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages