Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आंत्रप्रन्योर असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय Business Expo 2026 चे उद्घाटन

 मराठा आंत्रप्रन्योर असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय Business Expo 2026 चे उद्घाटन






पुणे (कटूसत्य वृत्त):- मराठा आंत्रप्रन्योर असोसिएशनच्या वतीने आयोजित International Business Expo 2026 चे उद्घाटन आज राज्याचे सहकार मंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. तब्बल ५०० हून अधिक उद्योजकांचे स्टॉल्स असलेले हे भव्य प्रदर्शन उद्योग, व्यापार आणि सेवाक्षेत्रातील नव्या संधींचे दालन ठरत आहे. विविध क्षेत्रांतील यशोगाथा येथे प्रेरणादायी ठरत असून नवउद्योजकांना दिशा देणाऱ्या आहेत. आजपासून सुरू झालेला हा एक्स्पो १ मार्च २०२६ पर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सर्वांसाठी खुला असणार आहे.


मराठा समाजातील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी एम.ई.ए.ने सक्षम आणि परिणामकारक व्यासपीठ उभे केले आहे. आज या संघटनेशी १२०० हून अधिक उद्योजक जोडले गेले असून व्यापार, उद्योग, उत्पादन आणि सेवा अशा सर्व क्षेत्रांत मराठा बांधवांनी एकत्र येत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच हा एक्स्पो केवळ व्यावसायिक मेळावा नसून मराठा समाजाच्या प्रगतीचा, स्वाभिमानाचा आणि सामूहिक शक्तीचा उत्सव ठरत आहे.


आपले आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना व्यापारमार्ग सुरक्षित केले, बंदरांचा विकास केला आणि सशक्त अर्थकारणाची पायाभरणी केली. कारण अर्थव्यवस्था मजबूत असेल तर स्वराज्यही मजबूत राहते, ही त्यांची दूरदृष्टी होती. त्याच विचारांचा वारसा जपत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी MEA सारखे व्यासपीठ निर्माण करण्याचा संकल्प आज साकार होताना दिसत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ यांसारख्या उपक्रमांद्वारे नवउद्योजकतेला अभूतपूर्व प्रोत्साहन दिले आहे. दहा वर्षांपूर्वी स्टार्टअपची संख्या पाचशेच्या आसपास होती; आज ती दोन लाखांवर पोहोचली आहे. यातील ४५ टक्क्यांहून अधिक स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक आहे, ही महिलाशक्तीच्या सहभागाची प्रेरणादायी बाब आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील उद्योगांना नवचैतन्य मिळाले असून थेट परकीय गुंतवणुकीत राज्य देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. विशेषतः पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याने रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे आणि पुण्याचे जागतिक औद्योगिक नकाशावरील स्थान अधिक दृढ होत आहे. मराठा उद्योजकांना बळ देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सक्षमीकरण करण्यात आले असून लाखो तरुणांना स्वयंरोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम व्यवस्था उभी करण्यात आली आहे.


आज या एक्स्पोच्या माध्यमातून समाजाच्या ‘नेटवर्क’चा वापर समाजाच्या ‘नेटवर्थ’साठी करण्याचा संकल्प दृढ करण्यात आला. सामूहिक शक्ती, परस्पर सहकार्य आणि उद्योजकतेच्या बळावर मराठा समाज नव्या आर्थिक उंचीवर झेपावेल, याचा ठाम विश्वास या भव्य आयोजनातून व्यक्त होत आहे.


यावेळी महापौर मंजुषाताई नागपुरे, खासदार श्रीरंगअप्पा बारणे, राजेश पांडे, असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, उपाध्यक्ष नितीन भोसले, प्रमोद साठे, विजय गवारे, श्रीनाथ भिमाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मराठा उद्योजक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments