Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात मृदा व जल परिक्षण जनजागृती

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात मृदा व जल परिक्षण जनजागृती




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराअंतर्गत मौजे रानमसले ता. उत्तर सोलापूर  येथील ग्रामपंचायतीच्या मुख्य व्यासपीठावर मृदा व पाणी परिक्षण महत्व याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून प्रा. बाबाजी सिरसट (लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा, सोलापूर) हे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी रानमसले गावचे सरपंच मनोहर क्षिरसागर, उपसरपंच रमेश सुतार, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण कुलकर्णी, ग्रामस्थ दशरथ गरड, लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. अपूर्वा पिस्के, प्रा. आशिष सरकाळे, रोसयो स्वयंसेवक, रानमसले गावातील सर्व ग्रामस्थ, जि. प. प्रा. शाळेतील सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रा. आशिष सरकाळे यांच्या हस्ते शाल देऊन करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. बाबाजी सिरसट यांनी मृदा व पाणी परिक्षण महत्व याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. माती व पाणी या दोन मुख्य घटकांवर शेतीची गुणवत्ता व सुपीकता अवलंबून असते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील सेंद्रीय कर्ब वाढवणाऱ्या उपयुक्त जीवाणूंचा ऱ्हास होउन मातीचे आरोग्य व सुपीकता कमी होत चालली आहे. मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा समतोल वापर करून सेंद्रिय खतांच्या वापर वाढविला पाहिजे. माती परिक्षणामुळे आपणास जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते व त्यानुसार सेंद्रीय खतांबरोबर रासायनिक खतांचा समतोल वापर कसा करावा याविषयी ठरविता येते. माती बरोबरच पाणी परिक्षण करणे खुप महत्वाचे आहे. विहिरीतील व बोअरवेलमधील अतिक्षारयुक्त पाणी शेतीसाठी वापरल्यामुळे मातीतल्या क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन जमिनी क्षारपट होत चालल्या आहेत. अतिक्षारयुक्त जमिनीत रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केल्याने त्यातील नत्राची क्षारांससोबत रासायनिक क्रिया होऊन मातीतले पिकांसाठी हानीकारक चुनखडीचे प्रमाण वाढते व रासायनिक खतातील नत्र पिकांना लागु न होता ते वाया जाते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्याचे परिक्षण करणे आवश्यक आहे. असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करून आपल्या शंकांचे निरीक्षण करून घेतले. स्वयंसेवक सानिका यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी रानमसले गावातील सर्व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन सावरी बिराजदार व भक्ती बिडवे यांनी व आभारप्रदर्शन सानिका यादव यांनी व्यक्त केले. या व्याख्यानासाठी सर्व स्वयंसेवकांचे व रानमसलेतील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments