शाळा गुणवत्ता मूल्यमापन योजनेत सिंहगड पब्लिक स्कूलला ‘अ’ प्लस श्रेणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

शाळा गुणवत्ता मूल्यमापन योजनेत सिंहगड पब्लिक स्कूलला ‘अ’ प्लस श्रेणी

शाळा गुणवत्ता मूल्यमापन योजनेत सिंहगड पब्लिक स्कूलला ‘अ’ प्लस श्रेणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज या शैक्षणिक संस्थेला ‘अ’ प्लस श्रेणी प्राप्त झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळेचा लौकिक सोलापूर जिल्ह्यासह राज्यस्तरावर उंचावला आहे. सोलापूरला SQAAF अंतर्गत A+ श्रेणी लाभला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सखोल बाह्य मूल्यमापन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शालेय व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच सहशालेय व क्रीडा उपक्रम या सर्व निकषांवर शाळेने उत्कृष्ट कामगिरी केल्याने तिला ‘अ’ प्लस श्रेणी बहाल करण्यात आली.

या यशामागे सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव व सिंहगड शिक्षण संकुल, केगाव, सोलापूरचे संकुल संचालक संजय नवले यांचे कुशल मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या शाळेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या यशाने मोठी पावती मिळाली आहे.

या यशाबद्दल शिक्षण संचालक, शिक्षण विभाग, पुणे यांनी सिंहगड शिक्षण संस्थेचे अभिनंदन करत शाळेच्या गुणवत्तावर्धनाच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले आहे. तसेच सहसचिव व संकुल संचालक संजय नवले यांनी शाळेच्या सर्व घटकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून, भविष्यातही गुणवत्तावृद्धीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या यशामुळे परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा मान अधिक उंचावला असून, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा सदैव कटिबद्ध राहील, असे संजय नवले यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages