परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर

परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर





मुंबई(कटूसत्य वृत्त):-   भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न तुटणारे आहे, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी केले.

महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स येथे आयोजित हिरे व्यापार क्षेत्रातील उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साली, हिरे उद्योगाशी संबंधित उद्योजक आणि मान्यवर उपस्थित होते.

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी मुंबई भेटीचा विशेष उल्लेख करताना अँटवर्प आणि मुंबई या दोन्ही शहरांची तुलना आर्थिक केंद्र म्हणून केली. भारत हा जगातील हिऱ्यांचे उगमस्थान असून हिरे व्यापाराची हजारो वर्षांची परंपरा या देशाला लाभली आहे. अँटवर्प आणि भारत यांच्यातील हिरे व्यापाराचे संबंध अनेक दशकांपासून परस्परपूरक स्वरूपाचे राहिले आहेत. आज जगातील दहा पैकी नऊपेक्षा अधिक हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात, तर अँटवर्प हे जागतिक हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले.

भारतीय उद्योजकांनी शंभर वर्षांपूर्वी अँटवर्पमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिरे व्यापारात आपले स्थान निर्माण केले. विश्वासार्हता, मेहनत आणि व्यावसायिक प्रामाणिकतेच्या बळावर भारतीय समाजाने अँटवर्पमध्ये भक्कम स्थान निर्माण केले असून आज अनेक भारतीय कुटुंबे तेथे हिरे उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी नमूद केले.

भारत आणि बेल्जियम यांची हिरे उद्योगातील ताकद परस्परपूरक असल्याचे सांगताना त्यांनी भारताला ‘जगाची कार्यशाळा’ तर अँटवर्पला ‘जगाला जोडणारे व्यासपीठ’ अशी उपमा दिली. दोन्ही देशांमधील हिरे व्यापार अधिक सक्षम करण्यासाठी एचआरडी अँटवर्पचे नवे कार्यालय मुंबईत सुरू करण्यात येत असून त्यामुळे व्यापार संबंधांना अधिक बळ मिळेल असे सांगितले.

भारतीय व्यावसायिकांना बेल्जियममध्ये सुलभ व्हिसा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा उल्लेख करताना त्यांनी व्यापारास पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी बेल्जियम सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. भारत आणि युरोपियन संघ यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे हिरे उद्योगासह विविध क्षेत्रांतील व्यापाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता यांनी प्रास्ताविकात भारत आणि बेल्जियम यांच्यातील दीर्घकालीन हिरे व्यापार भागीदारीचा आढावा घेतला. अँटवर्पने भारतीय हिरे उद्योगाच्या जागतिक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. भारत डायमंड बोर्स हे जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र असून सुमारे २,५०० कार्यालये आणि दररोज ४५ हजारांहून अधिक व्यावसायिक येथे व्यवहार करतात, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच भारताच्या किम्बर्ली प्रोसेस अध्यक्षपदाच्या काळात बेल्जियमकडून सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साली यांनी भारत डायमंड बोर्सला भेट देणारे बार्ट डी. वेव्हर हे भारताबाहेरील पहिले पंतप्रधान असल्याचे सांगून या भेटीला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे नमूद केले. भारत आणि बेल्जियम यांनी जागतिक हिरे मूल्यसाखळीत परस्परपूरक भूमिका बजावत मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण केली आहे. २०२५-२६ मध्ये दोन्ही देशांमधील रत्न व दागिने व्यापार सुमारे ३.५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचला असून या उद्योगातून भारतात लाखो कुटुंबांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात भारत-बेल्जियम हिरे व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांतील उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आगामी काळात नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी बेल्जियमचे राजदूत डिडिएर व्हॅंडरहासेल्ट, महावाणिज्यदूत फ्रँक गीर्केन्स, भारताचे बेल्जियममधील राजदूत प्रणय वर्मा, डायमंड बोर्सचे पदाधिकारी आणि हिरे उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages