पुण्यातील २४ नवनिर्वाचित नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार?
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन करत १६५ पैकी तब्बल ११९ जागा जिंकल्या. मात्र, या विजयानंतरही पक्षातील २४ नवनिर्वाचित नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत असल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही पराभूत उमेदवारांनी संबंधित विजयी उमेदवारांविरोधात जिल्हा लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. नियमानुसार निकालानंतर दहा दिवसांच्या आत निवडणुकीबाबत आक्षेप नोंदविता येतो. त्यानुसार या मुदतीत २४ नगरसेवकांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या आहेत.
महापालिकेच्या निवडणूक विभागाला न्यायालयाकडून संबंधित याचिकांबाबत समन्स प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व नगरसेवकांना आपले पद टिकवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. एकाचवेळी २४ नगरसेवक न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार असल्याने नव्या सभागृहातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींचाही प्रश्न
दरम्यान, आणखी तीन नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. सुधारित Maharashtra Municipal Corporations Act मधील कलम १० (ड) नुसार, निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामांवरही अपात्रता लागू होऊ शकते. यापूर्वी फक्त निवडणुकीनंतरच्या बांधकामांवर कारवाईची तरतूद होती.
प्रशासनाने संबंधित तक्रारींची प्राथमिक चौकशी सुरू केली असून, तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित नगरसेवकांविरोधात कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधितांचे पद रद्द होण्याची शक्यता आहे. नातेवाइकांच्या नावावर केलेल्या अनधिकृत बांधकामांचाही यात समावेश होऊ शकतो, असे कायद्यात नमूद आहे.
नव्या सभागृहातील सदस्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा होत असतानाच न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे काही नगरसेवकांना आता कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

0 Comments