स्थायी समिती चेअरमनपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

स्थायी समिती चेअरमनपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक

 स्थायी समिती चेअरमनपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक




सोलापूर (कटूसत्य वृत्त): महापौर, उपमहापौर आणि सभागृहनेता निवडीनंतर आता सोलापूर महानगरपालिकामध्ये स्थायी समितीच्या चेअरमनपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. पुढील महिन्यात ही निवडणूक होणार असून नव्याने निवडलेल्या १६ सदस्यांपैकी कुणाकडे चेअरमनपदाची धुरा जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली. एकूण १६ सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे १४, तर एमआयएम व शिवसेना यांचे प्रत्येकी एक सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे चेअरमनपद भाजपच्या गोटातच राहणार हे निश्चित मानले जात आहे.

मतदारसंघीय समीकरणांचा प्रभाव?

महापौर विनायक कोंडयाल हे शहर मध्य मतदारसंघातून, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या सोलापूर दक्षिणमधून, तर सभागृहनेते नरेंद्र काळे हेही सोलापूर दक्षिणमधून निवडून आले आहेत. त्यामुळे स्थायी समितीचे चेअरमनपद शहर उत्तर किंवा शहर मध्यकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्यावेळी सत्तावाटपात शहर उत्तरला महत्त्वाची तीन पदे मिळाली होती. त्यावेळी संख्याबळ जास्त असल्याने हा वाटा मिळाला होता. यावेळी मात्र शहर मध्यचे नगरसेवक संख्येने अधिक असल्याने तोच निकष लावला गेला तर चेअरमनपद शहर मध्यकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इच्छुकांची नावे चर्चेत, भाजपच्या १४ सदस्यांमध्ये अविनाश पाटील, सतीश सिरसीला, रंजिता चाकोते, गणेश वानकर, भारतसिंग बडूवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजकुमार पाटील, अमर पुदाले आदींची नावे आहेत. यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दिलीप माने यांची जवळीक लक्षात घेता गणेश वानकर किंवा जयकुमार माने यांच्या नावाचा विचार झाल्यास आश्चर्य वाटू नये, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चाकोते, वानकर, माने चर्चेत, बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना पद देऊ नये, असा एक मतप्रवाह असला तरी तो निकष शिथिल होऊ शकतो. महापौर स्वतः अलीकडेच पक्षांतर करून भाजपमध्ये आलेले असल्याने रंजिता चाकोते, गणेश वानकर व जयकुमार माने यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

 सोशल इंजिनीअरिंगचा फॉर्म्युला,चेअरमन निवडताना समाजनिहाय प्रतिनिधित्वाचाही विचार होऊ शकतो. ओबीसी व मराठा समाजाला पदे मिळाल्यानंतर लिंगायत समाजाला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रंजिता चाकोते, अविनाश पाटील, राजकुमार पाटील, अमर पुदाले आदींची नावे पुढे येत आहेत.

निवडणुकीची तारीख लवकरच, स्थायी समितीच्या चेअरमनपदाची निवडणूक घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांकडे आहेत. महापालिकेकडून प्रस्ताव पाठवण्यात आला असून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. ३१ मार्चपूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करणे आवश्यक असल्याने ही निवड लवकर होणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages