राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची भाटशिरपुरा प्राथमिक शाळेला भेट; ‘नंदनवन’ घडविल्याचे गौरवोद्गार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची भाटशिरपुरा प्राथमिक शाळेला भेट; ‘नंदनवन’ घडविल्याचे गौरवोद्गार

 राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची भाटशिरपुरा प्राथमिक शाळेला भेट; ‘नंदनवन’ घडविल्याचे गौरवोद्गार



कळंब (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत लातूर शिक्षण विभागातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा येथे राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने भेट देऊन सखोल पाहणी केली. निकषानुसार शाळेच्या सर्व बाबींचे परीक्षण करण्यात आले.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रमुख तथा मूल्यांकन समितीचे प्रमुख शरद गोसावी (प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे) यांच्या नेतृत्वाखाली समितीने शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची क्षमताधिष्ठित प्रगती यांचा आढावा घेतला. समितीत विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे (पुणे), जिल्हा परिषद अकोला येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार, सदस्य सचिव (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला) वरिष्ठ अधिव्याख्याता अंकुश ससाने तसेच नगरपरिषद वाशिमचे प्रशासन अधिकारी नंदकिशोर मिटकरी यांचा समावेश होता.
यावेळी धाराशिवचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळामाते, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती किशोरी जोशी, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.
समितीने प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली. शाळेतील अद्ययावत सुविधा, स्वच्छ व सुबक परिसर, शैक्षणिक साहित्य, डिजिटल साधने आणि उपक्रमशील वातावरण पाहून समितीने समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख शरद गोसावी म्हणाले, “भाटशिरपुरा शाळा गेल्या तीन वर्षांपासून विभागात प्रथम क्रमांक मिळवत आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून येथे खऱ्या अर्थाने नंदनवन निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील ही शाळा इतरांसाठी आदर्श ठरावी अशीच आहे. येथे विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण व क्षमताधिष्ठित शिक्षण घेत आहेत.”
शाळेच्या गुणवत्तावृद्धीसाठी श्रीकांत तांबारे, सचिन तामाने, अमोल बाभळे, नागेंद्र होसाळे, श्रीमती कालींदा मुंडे, लिंबराज सुरवसे, राजभाऊ शिंदे, श्रीमती राजकन्या तोडकर, परमेश्वर वाघमोडे, गणपत तपिसे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
समितीच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी लेझीम, बुलबुल संचालन व स्वागतगीत सादर केले. इयत्ता सातवीतील कु. समृद्धी गायकवाड व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा गोविंदपुर केंद्रप्रमुख बाळकृष्ण तांबारे यांनी केले. सूत्रसंचालन कु. आनम शेख, कु. संध्या जाधव व कु. प्रणाली खाते यांनी केले, तर आभार कु. समृद्धी गायकवाड हिने मानले. शेवटी सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
▪️ चौकट ▪️
सलग तीन वर्षे विभागात प्रथम!
मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा ही शाळा सलग तीन वर्षे विभागात प्रथम क्रमांक मिळवत आहे. राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी समितीने प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन केले आहे. भविष्यातही शाळेला अधिक प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी कटिबद्ध असल्याचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages