Hot Posts

6/recent/ticker-posts

दादा पुन्हा या…’ अस्थी कलशासमोर ओघळले अश्रू, सोलापूरकरांचा फुटला टाहो

 दादा पुन्हा या…’ अस्थी कलशासमोर ओघळले अश्रू, सोलापूरकरांचा फुटला टाहो


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि भावनिक जीवनावर खोल जखम उमटली आहे. “सामान्यांचा नेता, संघर्षातून उभा राहिलेला मार्गदर्शक आणि जनतेचा खरा आधारवड” म्हणून ओळखले जाणारे अजितदादा आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या जाण्याने सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.
कोल्हापूर येथून दुपारी चार वाजता स्व. अजितदादांचा पवित्र अस्थी कलश सोलापूरमध्ये दाखल झाला. सोलापूरकरांना अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी हा अस्थी कलश राष्ट्रवादी काँग्रेस भवन, जुनी मिल कंपाऊंड येथे ठेवण्यात आला होता. अस्थी कलश परिसरात दाखल होताच वातावरण गंभीर, शांत आणि भावनांनी भारलेले झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर अनेकांच्या ओठांवर शब्दच नव्हते.
अस्थी कलशाचे दर्शन घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच शेकडो सामान्य नागरिक भावनाविवश झाले. “अजितदादा अमर रहें”, “नेता नाही तर कुटुंबप्रमुख गेला”, “दादा आम्हाला सोडून जाऊ नका” अशा आर्त घोषणा देत अनेक कार्यकर्त्यांचा टाहो फुटला. काही कार्यकर्ते अस्थी कलशासमोर नतमस्तक होऊन दीर्घकाळ शांत उभे राहिले, तर काहींच्या डोळ्यांतून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख यांनी हा पवित्र अस्थी कलश सोलापूरमध्ये आणला. त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण विधी अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीभावाने पार पडला. यावेळी गवळी वस्ती महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा सादर करण्यात आली. विठ्ठलनामाचा गजर, अभंग आणि भजनांच्या सुरांनी परिसर अधिकच भारावून गेला. अनेक महिलांनी डोळ्यांत अश्रू साठवत भजनात सहभाग घेतला.
या शोकाकुल प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी शहराध्यक्ष भारत जाधव, धर्मराज काडादी, माजी उप महापौर आप्पाशा म्हैत्रे
आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत चौधरी, गणेश पुजारी, हाजी मकबूल शेख, विनोद भोसले, आनंद मुस्तारे, महादेव चाकोते, प्रा. श्रीनिवास कोंडी, सुहास कदम, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ॲड. सलीम नदाफ, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अनिल उकरडे, वैभव गंगणे, चंद्रकांत पवार, इरफान शेख, मनोज शेरला, प्रशांत जाधव, महबूब पटेल, भास्कर आडकी, मौला शेख, बसवराज कोळी, महिपती पवार, दशरथ शेंडगे, मकरंद शिवशक्ती, अबोली मंजेली, आयुब शेख, स्वप्निल जाधव, शिवराज तलाठी, दत्तात्रय बनसोडे, निशांत तारानाईक, प्रदीप बालशंकर, श्रीकांत वाघमारे, रुपेश भोसले, सूर्यकांत मसळी, सचिन चलवादी, सागर गायकवाड, श्री जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी स्व. अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी मौन पाळले. “दादा आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने सर्वांनी स्व. अजितदादांना अखेरचे अभिवादन केले.
त्यानंतर अत्यंत शोकमय वातावरणात हा पवित्र अस्थी कलश पुढील धार्मिक विधीसाठी मोहोळ–कुरुल येथे रवाना करण्यात आला. अस्थी कलश निघताना पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा टाहो, घोषणा आणि अश्रूंचा पूर पाहायला मिळाला.
आज सोलापूरने केवळ एक नेता नाही, तर आपला माणूस, मार्गदर्शक आणि विश्वासाचा आधार गमावल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

Reactions

Post a Comment

0 Comments