Hot Posts

6/recent/ticker-posts

कोठेंचा मास्टरस्ट्रोक; दोन्ही देशमुखांना चेकमेट करत मारली बाजी

 कोठेंचा मास्टरस्ट्रोक; दोन्ही देशमुखांना चेकमेट करत मारली बाजी


महापौरपदासाठी विनायक कोंड्याल, उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडीत आमदार देवेंद्र कोठे यांनी राजकीय डावपेचात दोन्ही देशमुख गटांना चेकमेट देत बाजी मारली असून, भाजपकडून त्यांच्या भाऊजी विनायक कोंड्याल यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना संधी देण्यात आली आहे. दोघांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केले असून, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांची निवड केवळ औपचारिकता ठरणार आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत १०२ पैकी तब्बल ८७ जागा जिंकल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले. हे भाजपचे सोलापुरातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे यश मानले जात आहे.
महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच
महापौरपद हे ‘खुले’ प्रवर्गात असल्याने इच्छुकांची संख्या मोठी होती. आमदार कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल, आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख, भाजपचे वरिष्ठ नगरसेवक नरेंद्र काळे आणि अनंत जाधव ही प्रमुख नावे चर्चेत होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले नरेंद्र काळे यांना महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांची गटनेतेपदी निवड करून महापौरपदाच्या शर्यतीतून एक प्रभावी उमेदवार बाजूला करण्यात आला. त्यानंतर पक्षाने अखेर विनायक कोंड्याल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
संख्याबळ असूनही देशमुख गट मागे
महापालिकेतील भाजपच्या ८७ नगरसेवकांपैकी आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गटातील ४१ नगरसेवक निवडून आले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख गटाचे २५, तर सुभाष देशमुख समर्थकांचे १७ नगरसेवक आहेत.
संख्याबळाच्या दृष्टीने दोन्ही देशमुख गटांची एकत्रित ताकद कोठे समर्थकांपेक्षा अधिक असतानाही, अंतिम निर्णयात कोठे यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. यामागे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे पाठबळ निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.
थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क ठरला निर्णायक?
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, आमदार देवेंद्र कोठे यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क आणि वरिष्ठ पातळीवरची पकड यामुळेच महापौरपदाची संधी त्यांच्या गटाकडे आली. त्यामुळे पहिल्याच टर्ममध्ये दोन्ही देशमुखांना राजकीयदृष्ट्या चेकमेट देण्यात कोठे यांना यश आले आहे.
औपचारिक निवड आज
विनायक कोंड्याल आणि ज्ञानेश्वरी देवकर यांच्या उमेदवारी अर्जावर आज मतदान होणार असून, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. सोलापूर महापालिकेच्या सत्ताकेंद्रात आता कोठे गटाचे वर्चस्व अधिक ठळक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महापौरपदाच्या या निवडीतून सोलापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, आगामी काळात भाजपअंतर्गत राजकारणातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments