MDR-TB रुग्णांसाठी ‘BPaLM’ औषधोपचार प्रणाली ठरतेय वरदान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य आजार असून खोकताना, शिंकताना किंवा थुंकीद्वारे हवेमधून त्याचा प्रसार होतो. क्षयरोगाचे वेळेत आणि अचूक निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असून, यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडे अत्याधुनिक NAAT (Nucleic Acid Amplification Test) तपासणी सुविधा उपलब्ध आहे. या तपासणीद्वारे रुग्णास औषधांना दाद देणारा (Drug Sensitive) की औषधांना दाद न देणारा (Drug Resistant / MDR-TB) क्षयरोग आहे, याचे अचूक वर्गीकरण केले जाते.
या निदानानंतर पात्र रुग्णांना तातडीने ‘BPaLM’ ही नवीन व आधुनिक औषधोपचार प्रणाली सुरू करण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, टीबीएचव्ही कर्मचारी व आशाताई यांच्या सहकार्याने सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांवर क्षयरोगाचे निदान व उपचार पूर्णतः मोफत दिले जात आहेत.
माननीय पंतप्रधान यांच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका प्रशासन वेगाने आणि प्रभावीपणे पावले उचलत आहे. केंद्रीय क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, औषधांना दाद न देणाऱ्या (MDR-TB) रुग्णांसाठी ‘BPaLM’ ही प्रणाली अत्यंत परिणामकारक ठरत आहे.
BPaLM प्रणालीची वैशिष्ट्ये
यापूर्वी MDR-TB रुग्णांचा उपचार कालावधी अत्यंत क्लिष्ट असून १८ ते २० महिने इतका दीर्घ होता आणि त्यामध्ये ५ औषधांचा समावेश असायचा. मात्र प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘BPaLM’ आधुनिक प्रणालीमुळे उपचार कालावधी केवळ ६ महिन्यांवर आला आहे. या उपचारामध्ये केवळ ४ औषधे असून ती अधिक प्रभावी, सुरक्षित आणि रुग्णस्नेही आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्रामार्फत जून २०२५ पासून ही प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. सध्या १६ रुग्ण या उपचार पद्धतीखाली आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कावेरी या रुग्णीने ‘BPaLM’ उपचार यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, यासाठी आशाताई वैशाली आयवळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासोबतच इतर ३ रुग्णांनी देखील आपले उपचार यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
आयुक्तांच्या हस्ते सत्कार
या यशस्वी कामगिरीबद्दल आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्षयरोग निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य यंत्रणेचे विशेष कौतुक करण्यात आले.
प्रशासनाचे आवाहन
“क्षयरोगाला घाबरून न जाता, त्याची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळेवर निदान व पूर्ण उपचार घेतल्यास क्षयरोग नक्कीच बरा होऊ शकतो,” असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त आशिष लोकरे, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने व शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांनी संयुक्तपणे केले आहे.
क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्राशी किंवा सोलापूर महानगरपालिका शहर क्षयरोग केंद्राशी संपर्क साधून या आधुनिक उपचार सुविधेचा लाभ घ्यावा. यासाठी शहर क्षयरोग विभागासह संपूर्ण आरोग्य विभाग अहोरात्र कार्यरत आहे.
“निरोगी नागरिक, सक्षम देश, हाच खरा विकास
टीबीला हरवूनच होईल, भारताचा विकास.”
.png)
0 Comments