Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट

 सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांना लागू नाही, असा संभ्रम काही काळ निर्माण झाला होता. याबाबत आता माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडत मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई)ने सन २०१० पासून शाळांमधील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ची अट लागू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या सेवेत असलेल्या आणि ५३ वर्षांपर्यंत वय असलेल्या शिक्षकांना दोन वर्षांच्या आत ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठरलेल्या मुदतीत पात्रता पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई होऊ शकते.

विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे आवश्यक ठरणार आहे. याशिवाय शिक्षकांच्या निवड प्रक्रियेसह वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीही ‘टीईटी’ची अट लागू करण्यात आली आहे.

या निर्णयाचा परिणाम म्हणून सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत सुमारे ३५ ते ४० शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. १२ ते २० वर्षांहून अधिक सेवा केलेल्या अनेक शिक्षकांनाही आता वेतनश्रेणीसाठी ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना उतारवयातही उन्हाळी सुट्टीत ‘टीईटी’च्या तयारीस लागावे लागणार आहे.

इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांवर माध्यमिक शाळेत नियुक्त असलेल्या बीएडधारक शिक्षकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवृत्तीस पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असलेले शिक्षक वगळता, इतर सर्व शिक्षकांना दोन वर्षांच्या आत ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांकडून ‘टीईटी’ उत्तीर्ण व अनुत्तीर्ण शिक्षकांची सविस्तर माहिती मागवली असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. दिलेल्या मुदतीत पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Reactions

Post a Comment

0 Comments