Hot Posts

6/recent/ticker-posts

चार वर्षांनंतर जि.प.मध्ये लोकप्रतिनिधी येणार; निवडणूक प्रक्रिया सुरू

 चार वर्षांनंतर जि.प.मध्ये लोकप्रतिनिधी येणार; निवडणूक प्रक्रिया सुरू




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध समित्यांच्या सभापतींची निवड होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद भवनातील पदाधिकाऱ्यांसाठी राखीव दालनांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील तसेच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांच्या दालनांची प्रत्यक्ष पाहणी केली. मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधी नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांसाठी राखीव असलेली अनेक दालने कुलूपबंद होती, तर काही दालने प्रशासकीय कामकाजासाठी वापरण्यात येत होती.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील सात दिवसांत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर कृषी व पशुसंवर्धन, अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य तसेच समाजकल्याण समितीच्या सभापतींची निवड होणार असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पदाधिकाऱ्यांसाठी राखीव असलेली आणि दीर्घकाळापासून बंद असलेली दालने दुरुस्त करण्यात येत असून, सध्या प्रशासकीय कारणांसाठी वापरण्यात येणारी काही दालने पुन्हा पदाधिकाऱ्यांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांच्यासाठी स्वतंत्र दालने उपलब्ध करून देण्याची कार्यवाहीही प्रशासनाकडून सुरू आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments