महापालिका निवडणूक खर्चाचा घोळ; १०२ विजयी नगरसेवक अडचणीत
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या १०२ नगरसेवकांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसाचा निवडणूक खर्च अद्याप सादर केलेला नाही. या सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून खर्च सादर करण्याबाबत मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांनी बुधवारी दिली.
महापालिका निवडणुकीत एकूण ५६४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक असून, तसे न केल्यास संबंधित उमेदवार तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरू शकतो, असा नियम आहे.
दरम्यान, निवडणुकीत पराभूत झालेल्या २० उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्च सादर करण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या उमेदवारांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बहुतांश उमेदवारांनी १० जानेवारीपर्यंतचा खर्च सादर केला आहे. मात्र, प्रचाराचा शेवटचा दिवस मंगळवार, १३ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या पदयात्रा, सभा व इतर कार्यक्रमांचा खर्च अद्याप सादर झालेला नाही. निवडून आलेल्या उमेदवारांनी १२ जानेवारीपर्यंतचा खर्च दिला असला, तरी शेवटच्या दिवसाचा खर्च प्रलंबित असल्याचे मुख्य लेखापाल कार्यालयाकडून सांगण्यात आले.
निवडणूक खर्च सादर न करण्याबाबत काही उमेदवारांकडून आजारपण, पराभवामुळे मानसिक तणाव, वकिलांशी संपर्क साधत असल्याची कारणे दिली जात आहेत. मात्र, १५ दिवसांनंतर अशी कारणे ग्राह्य धरली जाणार नाहीत, त्यानंतर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणुकीत उमेदवारासाठी नऊ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती. १५ दिवसांनंतर प्रशासन स्वतः खर्च मागविण्याची प्रक्रिया सुरू करते, तर ३० दिवसांनंतरही खर्च सादर न झाल्यास विभागीय कार्यालयांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठविला जातो, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
.png)
0 Comments