आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने १ हजार कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा केला पार..!
रायगड जिल्ह्यातील पहिली पतसंस्था ठरण्याचा मान; सभासदांच्या विश्वासातून ऐतिहासिक यश
अलिबाग (कटूसत्य वृत्त) :- आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, अलिबाग या संस्थेने १ हजार कोटी रुपयांच्या एकत्रित व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला असून रायगड जिल्ह्यातील ही पहिलीच पतसंस्था ठरली आहे, जी या भरीव कामगिरीपर्यंत पोहोचली आहे. ही माहिती संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील आणि अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी बुधवार (दि. २१) रोजी अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
१९९८ साली स्थापन झालेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने अवघ्या २७ वर्षांत रायगड जिल्ह्यासह राज्यभरात विश्वासार्ह आणि सक्षम आर्थिक संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज संस्थेचा एकूण एकत्रित व्यवसाय १००३ कोटी रुपयांवर पोहोचला असून त्यामध्ये ५५८ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ४४५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
२०२४–२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस संस्थेचा एकत्रित व्यवसाय ७५२ कोटी ७७ लाख रुपये इतका होता. मार्च २०२६ पर्यंत १ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र सभासदांनी संस्थेवर दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे अवघ्या दहा महिन्यांत २५० कोटी रुपयांची वाढ होऊन हा टप्पा अपेक्षेपेक्षा आधीच गाठण्यात आला, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, १००३ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय असूनही आदर्श पतसंस्थेचा ग्रॉस एनपीए (थकबाकी) १ टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे आदर्श ही राज्यातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम (एफएसडब्ल्यूएम) पतसंस्थांपैकी एक मानली जात आहे.
आदर्श पतसंस्थेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या एकूण २२ शाखा कार्यरत आहेत. यामध्ये एक स्वतंत्र गोल्ड कर्ज शाखा तसेच पुण्यातील दोन शाखांचा समावेश आहे. पुण्यातील एका पतसंस्थेचे यशस्वी विलीनीकरणही करण्यात आले असून सर्व शाखा नफ्यात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
कर्जवसुलीबाबत कोणतीही तडजोड न करता काटेकोर धोरण राबवण्यात आले. प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःला झोकून देऊन काम केल्यामुळे हे यश शक्य झाले, असे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले. ३१ मार्च २०२६ पर्यंतही ग्रॉस एनपीए १ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या सहकारी पतसंस्थांविषयी अविश्वासाचे वातावरण असतानाही आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेवर मात्र सभासद व ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. प्रामाणिक सेवा, वेळेवर कर्जवसुली, ठेवीदारांचे हित जपणे आणि पारदर्शक कारभार यामुळे संस्थेच्या व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे. भविष्यात राज्यातील पहिल्या पाच अग्रगण्य पतसंस्थांमध्ये आदर्शला स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचेही संस्थापक सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले.
आदर्श पतसंस्थेच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवी दिशा मिळाली असून, सहकारातून आर्थिक सशक्तीकरण शक्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

0 Comments