ईव्हीएम, पैसा आणि सत्तेच्या गैरवापरामुळे भाजपचा विजय : शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप नव्हे, तर ईव्हीएमच निवडून आला आहे, अशी जोरदार टीका खा. प्रणिती शिंदे यांनी केली. काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडणूकपूर्व सर्व्हेमध्ये आघाडीवर होते. मात्र ईव्हीएममधील घोळ, पैसा व सत्तेचा गैरवापर यामुळे भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
महानगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी मोहन जोशी, खा. प्रणिती शिंदे आणि प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत निवडणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
खा. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, गेल्या नऊ-दहा वर्षांत भाजपचा भ्रष्टाचारी कारभार, टेंडरमधील टक्केवारी, प्रशासकीय नाकर्तेपणा, अघोषित आणीबाणीचे वातावरण तसेच धार्मिक तेढ निर्माण करून सत्तेचा गैरवापर करण्यात आला आहे. सर्व शासकीय यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचा वापर करून भाजपने विजय मिळविल्याचा आरोपही त्यांनी केला.
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे संघर्ष केला असून, पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष नव्याने उभा करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, शहर जिल्हा काँग्रेसचे संपर्कप्रमुख मोहन जोशी यांनीही भाजपवर टीका करताना सांगितले की, काँग्रेसच्या जीवावर राजकीय कारकीर्द घडवलेले काही नेते आज काँग्रेसवरच टीका करत आहेत. त्यांचे प्रस्थ काँग्रेसमुळेच निर्माण झाले असून, भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्त निष्ठा दाखवण्यासाठी ते खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता टीका केली.
या बैठकीस शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, नरसिंग कोळी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.png)
0 Comments