बाहेरच्यांनी सोलापूरची संस्कृती बिघडवू नये
खा. प्रणिती शिंदेंनी पालकमंत्र्यांना सुनावले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसच्या पराभवावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी "दोन कदम पीछे नही, 50 फूट नीचे गिरे, गिरे तो गिरे फिर भी टांग ऊपर" अशी काँग्रेसची स्थिती असल्याची टीका केली होती.
या टीकेला खासदार प्रणिती शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिले. पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावरून त्यांची संस्कृती दिसतात. सोलापूर हे प्रतिष्ठित शहर आहे, बाहेरच्या लोकांनी ही प्रतिष्ठा बिघडवू नये, असे खडेबोल पालकमंत्री गोरे यांना सुनावले.
२०१७ मध्ये भाजपच्या लाटेत महापालिकेत काँग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र केवळ दोनच नगरसेवक निवडून आले. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. हा पराभव वेदनादायी असला तरी तो अंतिम नाही. राजकारणात हार-जीत होत असते. मात्र, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी असते, असा भावनिक साद खासदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्रातून साधला होता.
या पत्रावरून काँग्रेसच्या पराभवावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी खासदार शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचे उमेदवार कोण होते हे हे खासदारांना माहिती नाही. पक्षाच्या प्रचार मोहिमेत त्या सहभागी नव्हत्या. दिल्लीत बसून महापालिकेच्या निवडणुकीचे नियोजन करतात तर मग यापेक्षा चांगला निकाल येऊच शकत नाही.
"दोन कदम पीछे नही, 50 फूट नीचे गिरे, गिरे तो गिरे फिर भी टांग ऊपर" अशी ही अवस्था असल्याची टीका पालकमंत्र्यांनी केली होती. त्याला उत्तर देताना खासदार शिंदे म्हणाल्या, पालकमंत्री ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावरून त्यांचे संस्कार व संस्कृती कळते. महापालिका निवडणुकीत त्यांनी जे काय केले, ते सर्वांनी पाहिलेच आहे. सोलापूर एक प्रतिष्ठित शहर आहे, बाहेरच्या लोकांनी येथे येऊन संस्कृती बिघडवू नये, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

0 Comments