सोलापूरात 'ठाकरेंच्या शिवसेने'मध्ये मोठी खांदेपालट
संपर्क प्रमुखपदी सुषमा अंधारे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मोठ्या प्रमाणात संघटनात्मक खांदेपालट करण्यात आली आहे. सोलापूर शिवसेनाच्या संपर्क प्रमुखपदी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर सोलापूरमधील शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. तत्कालीन संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे पक्षात गळती वाढली होती. त्यानंतर सोलापूर महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याने संघटनात्मक आव्हान उभे राहिले होते.
या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आक्रमक भूमिका, स्पष्ट वक्तव्ये आणि संघटन कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अंधारे यांच्याकडून गळती थांबवणे, नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करणे आणि आगामी निवडणुकांसाठी संघटना मजबूत करणे, अशी अनेक आव्हाने असणार आहेत.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या सोलापूरच्याच असल्यामुळे येत्या काळात सोलापूरच्या राजकारणात अंधारे विरुद्ध वाघमारे असा थेट राजकीय सामना पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही बाजूंच्या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूरचे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुषमा अंधारे यांची नियुक्ती ही सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

0 Comments