खुनी हत्येच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती उघड- खा. प्रणिती शिंदे
भाजपच्या दडपशाही व राजकीय हत्येच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचे मूक आंदोलनसोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून, शहरात नेहमीप्रमाणे शांतता, सलोखा आणि खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडावी, अशी सुसंस्कृत परंपरा आहे. मात्र सत्तेच्या बळावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून या परंपरेला काळीमा फासला जात असल्याचा गंभीर आरोप सोलापूर शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
काल घडलेल्या बाळासाहेब सरवदे या तरुणाच्या निर्घृण हत्येमुळे भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती उघड झाली असून, निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात दमदाटी, उमेदवारांवर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबाव, मारहाण, दहशत निर्माण करणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे महाविकास आघाडीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणे व प्रचार करणे कठीण झाले असल्याचेही नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या झालेल्या हत्येप्रकरणी खुनाचा सूत्रधार व मारेकरी यांच्यातील मोबाईल संवादाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही करण्यात आली.
या संदर्भात सोलापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष अजय दासरी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक निंबर्गी, भारत जाधव, युसुफ मेजर, प्रताप चव्हाण, तिरुपती परकीपंडला, केशव इंगळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, बाळासाहेब सरवदे यांची हत्या ही कोणत्याही कौटुंबिक वादातून नसून, निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी टाकलेल्या दबावातून झालेली राजकीय हत्या आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, पोलीस व प्रशासन सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजप सत्तेच्या माजात आणि सत्तेच्या लालसेपोटी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करत असून, बिनविरोध निवडणुका घडवून आणण्यासाठी रक्त सांडायलाही मागेपुढे पाहत नाही. हे सोलापूरसह महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारे असून, सोलापूरकर हे कदापि खपवून घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली न जाता काम करावे. विरोधकांवर ज्या प्रकारे कारवाई केली जाते, त्याच प्रकारची कारवाई सत्ताधाऱ्यांवरही झाली पाहिजे. विरोधी कार्यकर्त्यांवर तडीपार नोटिसा काढल्या जात असताना सत्ताधाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे आणि एबी फॉर्म देताना प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधी उमेदवारांचे नावे जाणीवपूर्वक गाळली गेली, ठरलेल्या वेळेनंतर नियमबाह्य पद्धतीने एबी फॉर्म स्वीकारले गेले, तसेच काही ठिकाणी काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार पळवून नेण्यात आले. भाजपच्या उमेदवारांचे एबी फॉर्म तीन वाजून गेल्यानंतर दिले हे बेकायदेशीर असून, संबंधित उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असून सत्ताधाऱ्यांना कायदेशीर नोटिसाही पाठवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
आगामी निवडणुकीत भाजपकडून जातीय तेढ व ध्रुवीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असून, ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचे दिवस आणि मतदान एकाच वेळी येत असताना अशा संवेदनशील काळात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा षड्यंत्र करणार असल्याचे यांनी सांगितले.
निवडणूक लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे, हे मतपेटीतूनच स्पष्ट व्हावे, अशी भूमिका मांडत भाजपच्या दडपशाहीविरोधात आणि राजकीय हत्येच्या निषेधार्थ उद्या, दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी देऊन या आंदोलनात सर्व सोलापूरवासियांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

0 Comments